नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ८० पर्यटक अडकले; चार जण सुखरूप, उर्वरितांशी संपर्कासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न
गिरीश महाजनांची महत्त्वाची अपडेट; केंद्र-राज्य सरकारकडून २४ तास परिस्थितीवर लक्ष, पर्यटकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू

मुंबई : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली असून, आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक नागरिक बेपत्ता असून, पुराच्या पाण्यात घरे, इमारती, पूल, टॉवर आणि काही गावे वाहून गेल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. जनावरेही पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मानसरोवर यात्रेसाठी महाराष्ट्रातून सुमारे ८० पर्यटक नेपाळमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ चार पर्यटकांशी संपर्क होऊ शकला असून ते सुखरूप असल्याची माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
चार पर्यटक सुखरूप; इतरांशी संपर्काचा प्रयत्न
मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून सुमारे ८० पर्यटक मानसरोवर यात्रेसाठी गेले आहेत. त्यापैकी चार जणांशी संपर्क साधण्यात यश आले असून, ते सुरक्षित आहेत. मात्र, उर्वरित पर्यटकांची माहिती मिळवण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
रिचा टूर ट्रॅव्हल्सच्या दोन वाहनांमधून हे पर्यटक मानसरोवरला गेले होते. त्यापैकी एका वाहनात ३७ पर्यटक असल्याची माहिती आहे. या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि दक्षिण भारतातील इतर राज्यांतील नागरिकांचाही समावेश आहे. मात्र, या ३७ जणांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
हेही वाचा – मल्हार पर्व – धाराशिव पालिकेत धक्का तंत्र; ५ नगरसेवक भाजपच्या वाटेवर
अनेक पर्यटक संपर्काबाहेर
महाजन यांच्या शेजारी राहणारे एक कुटुंबही पाच ते सहा दिवसांपूर्वी नेपाळला गेले होते. त्यांच्याशी यापूर्वी संपर्क झाला होता. मात्र, आज सकाळपासून त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधता आलेला नसल्याची माहिती आहे. हे पर्यटक सध्या प्रदक्षिणा यात्रेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना माहिती गोळा करण्याच्या सूचना
नेपाळमध्ये आणखी किती भारतीय पर्यटक अडकले आहेत, याची माहिती घेतली जात आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून नेपाळला गेलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी स्वतंत्र ऑनलाइन सुविधाही सुरू करण्यात आल्याची माहिती महाजन यांनी दिली.
नातेवाईक, शेजारी किंवा ओळखीचे कोणी नेपाळला गेले असल्यास त्यांची माहिती शासनाला द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या माहितीच्या आधारे संबंधित पर्यटकांचा शोध घेणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे अधिक सोपे होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र-राज्य सरकार २४ तास अलर्ट मोडवर
नेपाळमधील परिस्थितीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दिल्लीतील संबंधित यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला असून महाराष्ट्र सरकार नेपाळमधील प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहे.
संपर्काबाहेर असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती मिळवण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू असून केंद्र आणि राज्य सरकार २४ तास अलर्ट मोडवर असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.





