Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारण

विचारांशी एकनिष्ठ अन्‌ साहेबांची निष्ठावंत- सुलक्षणा शिलवंत!

मिशन- PCMC: प्रभाग क्रमांक 20 मध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील लक्षवेधी लढत

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार आणि पदाधिकारी पळवापळवी सुरू असताना प्रस्थापित पक्ष आणि नेत्यांकडून ‘ऑफर’ असतानासुद्धा विचारांशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी केला आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा तोडाफोडीचा सामना रंगला आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होईल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे पुणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपाकडूनसुद्धा प्रवेशाची ‘ऑफर’ असताना पिंपरी-चिंचवडमधील सुलक्षणा शिलवंत-धर यांनी शरद पवार साहेबांसोबत आणि पुरोगामी विचारांसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दि.15 जानेवारी 2026 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे मतदान होणार आहे. दि. 16 जानेवारी रोजी निकाल हाती येईल. तत्पूर्वी, भारतीय जनता पार्टीत राष्ट्रवादीसह अन्य पक्षातील ‘मेगा प्रवेश’ करण्यात आले. शरद पवार गटाचे नेते राहुल कालटे यांनीसुद्धा हातात ‘कमळ’ घेतले. मात्र, शहराध्यक्ष तुषार कामठे आणि सुलक्षणा शिलवंत-धर यांनी विचारांची लढाई निरंतर ठेवण्याचा संकल्प केला आहे.

महापालिका प्रभाग क्र. 20 म्हणजे विशाल थिएटर परिसर, एच.ए. कॉलनी, महेशनगर, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, बल्लमनगर, लांडेवाडी झोपडपट्टी, सी. आय. आर.टी., पार्श्वनाथ सोसायटी, कासारवाडी माग, अग्रसेननगर, कुंदननगर भागातून सुलक्षणा शिलवंत-धर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. किंबहुना, प्रस्थापितांविरोधात संघर्षातून दोन हात करीत आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील अशोक सहकारी बँकेचे संस्थापक दिवंगत अशोक शिलवंत यांची मुलगी म्हणून सुलक्षणा शिलवंत-धर यांनी सामाजिक- राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. 2017 मध्ये त्यांना राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकीचे तिकीट देण्यात आले. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर उच्चशिक्षीत उमेदवार आणि आंबेडकरी चळवळीतील शिलवंत कुटुंबियांचे योगदान याचा विचार करुन त्यांना 2019 मध्ये पिंपरी विधानसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र, स्थानिक राजकीय कुरघोड्यांमुळे ऐनवेळी त्यांचे तिकीट कापण्यात आले. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. त्यांनी ‘तुतारी’ चिन्हावर 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण, दुबार मतदान आणि अन्य मतदार संघातील अचानक समाविष्ट झालेले मतदान यामुळे त्यांना राजकीय फटका सहन करावा लागला, असे राजकीय जाणकार सांगतात.

“राजकारणात अनेक ऑफर, प्रलोभने आणि धोरणांचे खेळ असतात; पण माझा विश्वास आहे की विचारांशी निष्ठा ठेवणे ही खरी ताकद आहे. मी नेहमीच प्रगतिशील आणि जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या मूल्यांसोबत राहणार आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी, प्रामाणिकपणा आणि प्रामुख्याने जनतेसाठी सेवा करणे हेच खरे मार्गदर्शन ठरते.”
– सुलक्षणा शिलवंत-धर, मा. नगरसेविका.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button