Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

Share On

Shivraj Patil Chakurkar | काँग्रेसच्या राजकारणातील अभ्यासू, स्वच्छ प्रतिमेचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. लातूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे.

लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मलेल्या चाकूरकर यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. १९६७-६९ या काळात लातूर नगरपालिका सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे १९८० मध्ये ते लातूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले आणि १९९९ पर्यंत सलग सात वेळा विजय मिळवत लोकसभेतील एक प्रभावी व अभ्यासू नेता म्हणून उदयास आले.

हेही वाचा         :              राज्यात थंडीची मोठी लाट, तब्बल इतक्या जिल्ह्यांना अलर्ट जारी, पुढील 48 तास..

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि अवकाश यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९९१ ते १९९६ दरम्यान लोकसभेचे १० वे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहात त्यांनी लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण आणि नवीन ग्रंथालय इमारतीची उभारणी यांसारखे उपक्रम गतीमान केले.

२००४ मध्ये निवडणूक हरूनही काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत केंद्रातील गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. मात्र २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटींची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी राजीनामा दिला.

चाकूरकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संसदीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्येही त्यांनी जाहीरनामा समिती अध्यक्षपदासह विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. २०१० ते २०१५ दरम्यान ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ सुरू करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button