“पंतप्रधानपदाची स्वप्नं कधी-कधी बाबांनाही पडत असावीत”; मुख्यमंत्री फडणवीसांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला

Devendra Fadnavis | छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणने एका महिन्यात तब्बल ४५ हजार ९११ सौरऊर्जा पटलांची स्थापना करून मिळवलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्र प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या “एका महिन्यानंतर दिल्लीमध्ये मराठी माणूस पंतप्रधान असेल” या विधानावर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम काम करत आहेत. त्यांच्याबद्दल देशामध्ये प्रचंड प्रेम आहे. देशाला ते पुढे नेत आहेत. त्यांच्यासारखे काम कोणीच करू शकत नाही. त्यांचे आरोग्य उत्तम आहे. कार्यक्षमता ४० वर्षाच्या तरुणाला लाजवेल, अशी आहे. त्यामुळे २०२९ मध्येही देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच राहतील. फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाची खिल्ली उडवत पंतप्रधानपदाबाबतची स्वप्न कधी-कधी बाबांना पडत असावेत, असा टोला लगावला.
हेही वाचा : शंभर अब्ज डॉलर व्यापार उद्दिष्ट, मोदी-पुतिन चर्चेत २०३० पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमाची घोषणा
विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आज कोणावरही बोलणार नाही. आपल्याला रात्री झोप येत नाही त्यामागे बरीच कामे तातडीने मार्गी लावायची आहेत, ही चिंता असल्याचे कारण आहे. झोप येत नाही ही खंत नाही तर कामाच्या बाबतीतील एक प्रकारची उत्सुकता आहे. वडेट्टीवारांना वाटत असेल की त्यांच्या सरकारच्या काळात फारसी कामे झाली नाहीत. परंतु आता महायुतीचे सरकार बरीच कामे करतंय, अशी त्यांना खंत वाटत असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.




