शंभर अब्ज डॉलर व्यापार उद्दिष्ट, मोदी-पुतिन चर्चेत २०३० पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमाची घोषणा

नवी दिल्ली : भारत आणि रशिया संबंधांना नव्या टप्प्यावर नेण्यासाठी आणि दृढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शुक्रवारी सुमारे दीड तासांच्या चर्चेनंतर अनेक निर्णय जाहीर केले. त्यामध्ये पुढील पाच वर्षांत, २०३० पर्यंत दोन्ही देशांतील व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याबरोबरच व्यापक आर्थिक सहकार्याचा कार्यक्रमही घोषित केला.
ऊर्जा, संरक्षण, कामगार गतिशीलता, सागरी व आरोग्य क्षेत्रातील करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. रशियन नागरिकांसाठी ३० दिवसांचा मोफत ई-टुरिस्ट आणि ग्रुप टुरिस्ट व्हिसा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या २३व्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेनंतर, युक्रेनमधील परिस्थितीपासून आर्थिक, राजकीय आणि धोरणात्मक सहकार्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर मोदी व पुतिन यांच्यामध्ये चर्चा झाली. रशियाकडून भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करत असल्याची ‘शिक्षा’ म्हणून अमेरिकेने भारताच्या वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त आयातकर लादला आहे. अमेरिकेने या माध्यमातून भारत-रशिया संबंधांमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी, रशिया भारताच्या आर्थिक विकासासाठी अखंड ऊर्जापुरवठा करत राहील, असे आश्वासन पुतिन यांनी संयुक्त निवेदनाची घोषणा करताना दिले. त्यानंतर दोन्ही देशांच्या उद्याोजकांच्या बैठकीमध्येही याच मुद्द्याचा पुतिन यांनी पुनरुच्चार केला.
हेही वाचा – ‘सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘रशिया भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी स्थिर, अखंड इंधनपुरवठा सुरू ठेवेल. आम्ही पुरवठा अखंडपणे सुरू ठेवू’, असे पुतिन म्हणाले. पुतिन यांच्या आश्वासनानंतर रशियाच्या कच्च्या तेलाची कमी झालेली आयात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय दडपण, निर्बंध आणि शुल्कांच्या वातावरणातही आपले संबंध अधिक दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी व्यक्त केला.
भारत-रशिया संबंधांची सर्वात मोठी ताकद विश्वास हीच आहे, असे मोदी म्हणाले. ह्यआमचे ध्येय केवळ व्यापार वाढवणे नाही, तर जागतिक आव्हानांना टिकाऊ उपाय देणारी भागीदारी उभी करणे आहे. भारतात या (मेक इन इंडिया), भारतासोबत भागीदारी करा आणि एकत्रितपणे जगासाठी निर्मिती करा, असे आवाहन मोदींनी रशियातून मोठ्या संख्येने आलेल्या व्यापार-उद्याोजकांच्या शिष्टमंडळाला केले.
संरक्षण सहकार्यासंदर्भात, गेली अनेक वर्षे रशियाने लष्करी-तांत्रिक मदत केली आहे. भारताच्या तीन सैन्यदलांचे आधुनिकीकरणामध्ये रशियाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत समाधानकारक चर्चा झाली आहे, असे पुतिन म्हणाले. मात्र, संरक्षण उपकरणे आणि एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली किंवा सुखोई एसयू-५७ विमानांच्या खरेदीबद्दल दोन्ही नेत्यांनी तपशील जाहीर केला नाही. या संदर्भात करार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्याचा ६४ अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरवर नेण्यासाठी मुक्त व्यापाराला चालना देण्यात येणार आहे. भारत-युरेशियन आर्थिक संघामधील मुक्त व्यापार करार चर्चेला गती दिली जाईल. हा व्यापार असंतुलित असल्याने भारतातून आयात वाढवण्यावर भर दिला जाईल, असे पुतिन यांनी स्पष्ट केले. दोन्ही देश हळूहळू राष्ट्रीय चलनांमध्ये (रुपया-रुबल) अधिकाधिक व्यवहार करतील, असे पुतिन म्हणाले.





