पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत युवा नेते पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘‘सारथी’’
मिशन PCMC: भाजपाच्या बालेकिल्ल्यात पवार पिता-पुत्र ‘पॉवरफुल’ सुरुंग लावण्याच्या तयारीत!

पिंपरी-चिंचवड । अधिकराव दिवे-पाटील । पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शहरातील राजकीय हालचालींना वेग दिला असून, पक्षाचे युवा नेते पार्थ पवार ‘डिसिझन मेकर’ च्या भूमिकेत दिसत आहेत. नुकताच झालेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी शहरात दौरा केला. पक्षाचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी यांच्याशी थेट संपर्क ठेवला आहे. दुसरीकडे, ‘‘जनसंवाद’’ च्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील वातावरण ढवळून काढले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीने 2017 मध्ये वर्चस्व निर्माण केले. तत्कालीन दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी 2017 मध्ये महापालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता खेचून आणली. 2019 आणि 2024 मध्ये तीनपैकी दोन विधानसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे यांना ‘‘विधानसभा उपाध्यक्ष’’ पदाची जबाबदारी दिली. दुसरीकडे, भाजपानेसुद्धा विधान परिषदेवर अमित गोरखे आणि उमा खापरे यांना संधी देत भाजपाचा दबदबा शहरात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.
महायुती सरकारमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्रित असली तरी, आगामी महानगर पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार आहे. पक्षश्रेष्ठींनी महायुती केलीच, तरी शहरात पाडापाडीचे राजकारण होणार आहे. या रस्सीखेचमध्ये आता राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीत ‘‘कम बॅक’’ करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘‘जनसंवाद’’ ला युवा नेते पार्थ पवार यांच्या ‘‘जनसंपर्क’’ ची जोड देण्यात आली आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही विधानसभा मतदार संघात पार्थ यांनी ‘‘मॅरेथॉन दौरा’’ केला. भाजपाच्या बालेकिल्ल्यात पवार पिता-पुत्र ‘पॉवरफुल’ सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, नेते अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर मंगला कदम, माजी महापौर अपर्णा डोके माजी नगरसेवक वसंत बोराटे, संतोष लांडगे, यश साने असे सहकारी पार्थ पवार यांच्या दौऱ्यात दिसले.
पार्थ पवार ‘‘डिसिझन मेकर’’ च्या भूमिकेत…
पार्थ पवार यांचा हा दौरा केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता, तो राजकीय बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद, आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी यासाठी उपयोगात आणला जात असल्याचे दिसते. अनेक इच्छुक उमेदवारांनी त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडत, पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील काही महिन्यांपासून अंतर्गत हालचाली जोरात असून, महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर मजबूत पकड मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेष म्हणजे, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पार्थ पवार यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. त्यांच्या भेटीसाठी नगरसेवकपदासाठी इच्छुकांनी रांग लावल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. पक्षाच्या अंतर्गत गटबाजी, स्थानिक समीकरणे आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या दृष्टीने पार्थ पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी काही दिवसांत ते आणखी काही प्रभागांमध्ये दौरे करणार असून, या भेटींचा निकाल उमेदवारी प्रक्रियेत स्पष्टपणे दिसून येईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भाजपाचे शंकर जगताप- राष्ट्रवादीचे पार्थ पवार एकत्र!
चिंचवडमधील माजी महापौर अपर्णा डोके यांच्या नवरात्रोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपाचे आमदार शंकर जगताप आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार एकत्र आले. वास्तविक, उपमुख्यमंत्री अजित पवार भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही इच्छुक उमेदवार किंवा आजी-माजी पदाधिकाऱ्याच्या व्यासपीठावर गेले नाहीत. किंबहुना, पार्थ पवार यांनाही भाजपाच्या इच्छुकांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी दौऱ्यासाठी निमंत्रित केले नाही. पण, चिंचवडमधील अपर्णा डोके यांच्या उत्सवात योगायोगाने आमदार जगताप आणि पार्थ पवार एकत्र दिसले. त्यामुळे राजकीय वतुर्ळात या घटनेबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. कारण, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही, अशी वस्तुस्थिती आहे. याउलट, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मतदार संघात पार्थ पवार यांनी सर्वाधिक भेटी दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्या राजकीय संघर्ष गेल्या काही दिवसांत तीव्र झाला आहे.





