‘२०१९ पर्यंत भाजपसोबत खांद्याला खांदा लावून होतो’; उद्धव ठाकरेंचे वक्तव्य, ‘राजाला चूक सांगितली तर देशद्रोही ठरवले जाते!’
पत्रकारितेच्या भूमिकेवर ठाकरेंचे भाष्य; ‘पत्रकारांनी अंपायरसारखे तटस्थ असावे’, शरद पवार-बाळासाहेबांच्या मैत्रीचाही केला उल्लेख

मुंबई : भाजप आणि आमच्यात वैमनस्य नव्हते. २०१९ पर्यंत आम्ही खांद्याला खांदा लावून काम करत होतो, असे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. राजाला त्याची चूक सांगितली, तर तो सांगणाऱ्यालाच देशद्रोही ठरवतो; अशा परिस्थितीत काय करायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पत्रकारितेची भूमिका, मतभेद आणि लोकशाही यांवर भाष्य करताना त्यांनी पत्रकारांनी तटस्थ राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
शिवसेनेच्या पक्षनाव आणि चिन्हासंदर्भातील न्यायालयीन खटल्याच्या वार्तांकनाबाबत बोलताना, या प्रकरणाची माहिती आपण रात्री १२ ते १२.३० नंतर प्रशांत देसाई यांच्याकडून ऐकत असल्याचे ठाकरे म्हणाले. “माझ्या नशिबी धोंडेच पडणार आहेत; पण त्या धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
‘पत्रकारांनी अंपायरसारखे तटस्थ असावे’
पत्रकारितेच्या भूमिकेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचे बरेचसे काम प्रशांत देसाई यांनी केले आहे. त्यामुळे आपण तटस्थ राहावे, असे वाटते. क्रिकेट किंवा फुटबॉलच्या सामन्यात अंपायर ज्या पद्धतीने भूमिका बजावतो, त्याप्रमाणे पत्रकारांनीही तटस्थ राहायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र ही पत्रकारितेची गंगोत्री असल्याचे सांगत त्यांनी पत्रकारितेच्या परंपरेचा उल्लेख केला. व्यंगचित्रकार हा केवळ चित्र काढणारा नसून समाजातील घडामोडींवर भाष्य करणारा असतो, असेही ते म्हणाले. सोशल मीडियावर व्यंगचित्रे पाहायला मिळतात; मात्र पत्रकारितेने काळासोबत पुढे जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – FDA अधिकाऱ्यांना झिरवाळांचा इशारा! नियमबाह्य कारवाई केल्यास निलंबनाची टांगती तलवार
‘दर्पण’मधून लढाऊ पत्रकारितेची परंपरा
बाळशास्त्री जांभेकर यांच्या ‘दर्पण’ वृत्तपत्राचा उल्लेख करत ठाकरे यांनी लढाऊ पत्रकारितेच्या परंपरेवर भाष्य केले. ‘दर्पण’ म्हणजे आरसा असून, समाजासमोर वास्तव मांडण्याची भूमिका पत्रकारितेने बजावली पाहिजे, असे ते म्हणाले.
भाऊ महाजन यांनी सुरू केलेल्या ‘प्रभाकर’मधील ‘शतपत्रे’ आणि त्यातून मांडली जाणारी परखड मते यांचाही त्यांनी उल्लेख केला. कोणतीही व्यक्ती असो, तिच्या कृतीवर टीका करण्याची आणि सत्यशोधक वृत्ती जपण्याची परंपरा महत्त्वाची असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
शरद पवार आणि बाळासाहेबांच्या मैत्रीचा दाखला
मतभेद आणि मतभिन्नता यांत फरक असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे यांनी आचार्य अत्रे आणि त्यांचे आजोबा यांच्यातील मैत्रीचा दाखला दिला. दोघांमध्ये वाद अगदी टोकाला गेला होता; तरीही त्यांच्या घरात आचार्य अत्रे यांच्याबद्दल कधीही चुकीचे बोलले गेले नाही, असे ते म्हणाले.
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्रीही तितकीच घनिष्ठ होती; मात्र त्यांच्यात मतभेदही होते, असे त्यांनी सांगितले. शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे ‘वर्षा’ निवासस्थानी गेले होते. त्या वेळी पवार बाहेर गेले असताना बाळासाहेबांनी प्रतिभा पवार यांना पुष्पगुच्छ देत, आपला मित्र मुख्यमंत्री झाल्याचा आनंद असल्याचे सांगितले होते. मात्र, ते ज्या पद्धतीने मुख्यमंत्री झाले, ती पद्धत आपल्याला पटली नाही, अशी भूमिका बाळासाहेबांनी व्यक्त केल्याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला.
पत्रकारितेतील तटस्थता, सत्तेला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि मतभेदांचा आदर या मुद्द्यांवर भाष्य करत उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीत परखड टीका आणि सत्य मांडण्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.




