मोठी बातमी! ईद-ए-मिलादची शुक्रवारची सुट्टी रद्द; मुंबईत आता सोमवार, 8 सप्टेंबरला सुट्टी
हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवारला हलविण्यात आली

मुंबई : राज्यातील मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण ईद-ए-मिलाद यंदा मोठ्या बदलांसह साजरा होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, 5 सप्टेंबर 2025 (शुक्रवार) रोजी जाहीर करण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी 8 सप्टेंबर 2025 (सोमवार) रोजी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या निर्णयाची घोषणा सामान्य प्रशासन विभागाने केली असून, तो फक्त मुंबई शहर आणि उपनगरांपुरताच मर्यादित आहे. मुंबईबाहेरील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये 5 सप्टेंबरचीच सुट्टी कायम राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
मुस्लिम संघटनांचा पुढाकार
राज्य सरकारने यापूर्वी अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांपैकी ईद-ए-मिलादची सुट्टी 5 सप्टेंबरला ठेवण्यात आली होती. मात्र, 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असल्याने, हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी, 21 ऑगस्ट रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक झाली. या बैठकीत, मुस्लिम समुदायाने मिरवणुका सोमवार, 8 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे सरकारी सुट्टीतही बदल करण्यात आला.
कायदेशीर अधिष्ठान
हा बदल 8 मे 1968 रोजीच्या अधिसूचनेनुसार आणि परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 च्या कलम 25 अंतर्गत राज्य सरकारच्या अधिकारांचा वापर करून करण्यात आला आहे. यानुसार, मुंबई व उपनगरांमध्ये शुक्रवारची (5 सप्टेंबर) सुट्टी रद्द करून सोमवार (8 सप्टेंबर) हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे.
मुंबईकरांसाठी महत्त्वाचे
नवीन सुट्टीची तारीख: सोमवार, 8 सप्टेंबर 2025
जुनी रद्द केलेली तारीख: शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
फक्त मुंबई शहर व उपनगरांसाठी लागू
राज्याच्या इतर भागांमध्ये शुक्रवारचीच सुट्टी कायम
सामाजिक सलोखा आणि दोन्ही धर्मांच्या सणांचा सन्मान राखत सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह ठरत आहे. नागरिकांनी नवीन सुट्टीच्या तारखेनुसार आपली योजना आखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





