डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि केन्स सेमिकॉन यांच्यात सामंजस्य करार
शिक्षण विश्व : उद्योगाभिमुख अभ्यासक्रम विकास उपक्रम विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार

पिंपरी चिंचवड : डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आकुर्डी आणि केन्स सेमिकॉन प्रा.लि साणंद, गुजरात यांनी सेमिकंडक्टर शिक्षण क्षेत्रात प्रगती घडवून आणण्यासाठी तसेच उद्योग–शैक्षणिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
या करार वेळी केन्स सेमिकॉन प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघू पनिकर आणि डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मनीष भल्ला यांच्या हस्ते स्वाक्षरीत झाला. या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप संधी, संयुक्त संशोधन प्रकल्प, प्राध्यापक प्रशिक्षण, ज्ञान देवाण-घेवाण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम विकास यांसारख्या उपक्रमांवर सहकार्य करण्यात येणार आहे. या करारामुळे सैद्धांतिक शिक्षण आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव यामधील दरी कमी होऊन विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्णता व उद्योगाभिमुख कौशल्य विकसित होईल.
या प्रसंगी केन्स सेमिकॉन प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पनिकर यांनी भारतातील वाढत्या सेमिकंडक्टर व्यावसायिकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी उद्योग–शैक्षणिक सहकार्य अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. भल्ला यांनी या सहकार्यामुळे विद्यापीठाच्या जागतिक स्तरावर उद्योगाभिमुख शिक्षण देण्याच्या दृष्टीला बळ मिळेल आणि भारताच्या ‘ग्लोबल सेमिकंडक्टर हब’ होण्याच्या ध्येयात हातभार लागेल, असे सांगितले.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे भारतातील पहिले बी.टेक. सेमिकंडक्टर इंजिनिअरिंग कार्यक्रम राबवणारे विद्यापीठ असून अलीकडेच त्यांनी सेमिकंडक्टर शिक्षणासाठी अत्याधुनिक क्लीन रूम सुविधा उभारली आहे. तर केन्स सेमिकॉन प्रा. लि. कडे साणंद येथे उद्योगमान्य क्लीन रूम व अत्याधुनिक उत्पादन सुविधा असून, त्यांना सेमिकंडक्टर उत्पादन व सोल्यूशन्समधील समृद्ध अनुभव आहे.
या कराराबाबत संस्थेचे संस्थेचे चेअरमन सतेज डी. पाटील यांनी अभिनंदन करताना सांगितले की, हा सामंजस्य करार भारतातील सेमिकंडक्टर शिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि देशाला उच्च तंत्रज्ञान निर्मिती क्षेत्रातील सक्षम व कौशल्यपूर्ण व्यावसायिक घडविण्यासाठी तो पायाभूत ठरेल. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस एस. पाटील, संस्थेचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ संजय डी पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





