Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसातला सुरू करा; पुणे शहर गणेशोत्सव समितीची मागणी

पुणे : ‘लक्ष्मी रस्त्यासह सर्व मार्गांवरील विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसातला सुरू करावी,’ अशी मागणी पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून विविध गणेश मंडळांनी सोमवारी केली. याबाबत मानाच्या गणपती मंडळांशी संवाद साधण्यात येणार आहे. मुख्य मिरवणूक नेहमीच्या वेळेनुसार सुरू होणार असेल, तर लक्ष्मी रस्त्यावरून अन्य मंडळांना मिरवणूक सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी प्रशासनाकडे मागणी करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला.

पुणे शहर गणेशोत्सव समितीतर्फे आयोजित बैठकीस निमंत्रक संजय बालगुडे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, निंबाळकर तालीम मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पवार, हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, भरत मित्र मंडळाचे बाळासाहेब दाभेकर, गरुड गणपती मंडळाचे सुनील कुंजीर, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, उदय महाले, नरेंद्र व्यवहारे, मनीष साळुंके, अजय दराडे, विनायक धारणे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. बालगुडे यांनी प्रास्ताविकामध्ये बैठकीची भूमिका मांडली.

‘सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय झाला, तर आम्ही एका पथकासह सहभागी होण्यास तयार आहोत,’ असे बाल विकास मंडळाचे कार्याध्यक्ष कुणाल गिरमकर यांनी सांगितले. ‘वाद न होता मार्ग काढायचा आहे. ज्या आवाजातून अनेकांना बहिरेपणा येऊ शकतो असे प्लाझ्मा स्पीकर लावता कामा नये,’ अशी अपेक्षा व्यक्त करून, मोहिते यांनी ‘मानाच्या गणपती मंडळांना पथकांची आणि वेळेची मर्यादा घालून दिली पाहिजे,’ अशी मागणी केली.

हेही वाचा –  “शिवसेनेचाही बाप मीच”, भाजपा आमदार परिणय फुकेंच्या वक्तव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण

‘विसर्जन मिरवणुकीमुळे मंडळे बदनाम झाली आहेत. लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या तीनशेपैकी आठ मंडळांनी दहा तास घेतले, हा अभ्यास प्रशासनापुढे मांडला पाहिजे. लक्ष्मी रस्त्यावर वादन करण्यासाठी ढोल-ताशा पथके बिदागी घेत नाहीत. अन्य मंडळांना भरभक्कम बिदागी द्यावी लागते,’ असे मानकर यांनी नमूद केले.

माळवदकर म्हणाले, ‘खड्डे बुजविणे, विद्युत दिवे ही कामे करण्यासाठी महापालिका आहे. त्यासाठी राज्य उत्सव निधीतून पैसे खर्च करू नयेत. ठेकेदार आणि दलाल पोसले गेले, तर त्याला कडाडून विरोध केला पाहिजे. अनुदान मंडळ कार्यकर्त्यांच्या पदरात कसे पडेल, हे पाहिले पाहिजे.’

‘डीजे वाजवणाऱ्या मंडळांबरोबर आम्ही नाही. गणेशोत्सवात राजकारण येता कामा नये. नेतेमंडळींना दर्शनासाठी दुपारी बोलवावे. ते संध्याकाळी आले, तर कोंडी आणि रस्ते बंद करण्याचा नागरिकांना त्रास होतो,’ असे काकडे यांनी सांगितले.

‘सर्व मंडळांनी लक्ष्मी रस्त्याने जाण्याचा आग्रह धरू नये. ३०-३५ तास विसर्जन मिरवणूक हा वेळेचा अपव्यय आहे. पूर्वी ग्रामीण असलेला भाग महापालिकेत आल्याने आता शहरी झाला असून, तेथे आपल्यापेक्षा चांगला उत्सव होतो. लोकजागृती हा मूळ उद्देश कायम राहील, याची दक्षता घेतली पाहिजे. लक्ष्मी रस्त्याने आठ गणपती मंडळांना जाऊ देत. शहर वाढले असेल, तर आपण नवे मार्ग सुरू केले पाहिजेत,’ याकडे श्रीकांत शिरोळे यांनी लक्ष वेधले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button