‘एकनाथ शिंदे म्हणजे विलक्षण कलाप्रेमी माणूस’; अशोक सराफ

मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखा आणि बाल रंगभूमी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कलासेवक’ सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात अशोक सराफ यांनी एकनाथ शिंदे यांचे कलाप्रेम आणि कलाकारांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.
अशोक सराफ म्हणाले, की पुरस्कार खूप मिळाले आहेत, मिळत आहेत. आजचा पुरस्कार हा सुरुवातीपासूनच विलक्षण होता की मी वर्णनही करु शकत नाही. एवढ्या पावसात तुम्ही सगळेजण बाहेर उभे होतात. स्पेशल गाडीतून आम्ही आलो असा सन्मान मला पहिल्यांदाच मिळाला. माझ्या येण्यापासून जी काही सुरुवात सत्काराला झाली ती लक्षात ठेवण्यासारखी आहे.
हेही वाचा : एलन मस्क थेट ट्रम्प यांच्याशी भिडणार; नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली; नाव काय?
एकनाथ शिंदेंच्या हस्ते माझामा सत्कार करण्यात आला. एकनाथ शिंदे म्हणजे विलक्षण कलाप्रेमी माणूस. कलाकरांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कायम पुढे असतात. यापुढेही ते कलाकारांचे प्रश्न सोडवतील अशी खात्री मला आहे. एकनाथ शिंदेसारखा एक कलाप्रेमी माणूस, कलाकारांवर प्रेम असलेला माणूस आपल्याला उपमुख्यमंत्री म्हणून लाभला आहे. मी त्यांच्याकडून घेतलेला हा दुसरा मोठा पुरस्कार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारही त्यांच्याच हस्ते मिळाला होता. तो क्षण आणि आजचा क्षण दोन्ही माझ्यासाठी विलक्षण मानतो, असं अशोक सराफ म्हणाले.
माझं म्हणाल तर काय पुरस्कार मिळत गेले, लोक कौतुक करत गेले. मी विलक्षण दबला गेलो या कौतुकाखाली. मी माझं कौतुक करण्यापेक्षा मी प्रेक्षकांचं कौतुक करतो. कारण मी जे करत गेलो ते त्यांना आवडत गेलं. करणाऱ्यापेक्षा आवडणं महत्त्वाचं असतं. मग मला वेगळी सवय लागली की लोकांना आवडेल ते करायचं किंवा लोकांना आवडेल कसं याचा विचार करायचा. शिवाय आपण जे सादर करतो त्यावर विलक्षण प्रेम करावं. नवं शोधण्याची तयारी ठेवावी, असंही अशोक सराफ म्हणाले.





