ताज्या घडामोडीपुणे

मावळात मृत्यूचा पूल !

तळेगावजवळ कुंडमळा येथे पूल कोसळून चार मृत्युमुखी, दोन बेपत्ता : ४० पर्यटकांना वाचवण्यात यश !

तळेगाव / पुणे / मुंबई : पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये तळेगावजवळ पर्यटनस्थळ असलेल्या कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने नदीत पडून चार पर्यटक मृत्युमुखी पडले तर दोघे बेपत्ता आहेत. सहा पर्यटकांची प्रकृती गंभीर आहे, असे रुग्णालयातून सांगण्यात आले. यावेळी दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीतून ४० पर्यटकांना वाचविण्यात ‘एनडीआरएफ’ ला यश आले आहे.

तातडीच्या बचतकार्यामुळे..

कुंडमळ्यामध्ये प्रत्येक शनिवार-रविवारी पर्यटकांची गर्दी उसळलेली असते. अशीच गर्दी असताना या जुन्या लोखंडी पुलावर साधारण शंभर ते सव्वाशे पर्यटकांनी गर्दी केली आणि तो जुना पूल मधोमध तुटला, काही पर्यटक नदीमध्ये कोसळले आणि वाहू लागले. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले. ‘एनडीआरएफ’ च्या तुकड्याही दाखल झाल्या आणि तातडीने बचतकार्य हाती घेण्यात आले.

लोकप्रिय पर्यटनस्थळावर गर्दी..

मावळमधील कुंडमळा हे पर्यटनस्थळांपैकी एक आहे. विशेषत: पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी नदी, हिरवागार परिसर यामुळे येथे पर्यटकांची गर्दी असते. त्यातच सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या भागात आले होते. पर्यटकांची संख्या पुलावर जास्त झाल्याने आणि वजन प्रमाणाबाहेर गेल्यामुळे हा पूल कोसळला.

४० पर्यटकांची यशस्वी सुटका..

तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आल्यामुळे चाळीस पर्यटकांची यशस्वीरीत्या सुटका करण्यात आली. चार जणांचा मृत्यू झाला असून अजून दोन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. अद्याप कुंडमळ्यात किती पर्यटक बुडाले आहेत, याबाबत अद्याप आकडा स्पष्ट होऊ शकला नाही. घटनास्थळी अग्निशमन दल, मावळ वन्यजीव रक्षक यांची टीम पोहचली असून उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

अजित पवार ‘ॲक्शन मोड’ मध्ये..

जुना आणि सडलेला पूल असल्याने तो कोसळला, अशी एका वाक्यात पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच नवा पूल बांधण्याचीही घोषणा केली आहे.

हेही वाचा –  शिवसैनिकांचा रुद्रावतार.! उद्धवसेनेकडून स्मार्ट मीटरला विरोध

पुलासाठी आठ कोटी मंजूर..

प्रथमदर्शीकडून असे सांगण्यात येत आहे, की तो जो पूल होता तो फार सडलेला होता. त्यावर शंभर ते दीडशे पर्यटक उभे राहिले होते, तसेच ये-जा करत होते. अनेकां कडून दुचाकीही नेल्या जात होत्या. प्रमाणाबाहेर ओझ्यामुळे पूल कोसळला. यापूर्वीच या पुलाच्या डागडुजीसाठी आठ कोटी रुपये मंजूर आहेत. आणखी सविस्तर माहिती जिल्हाधिकारी देतील, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

सखोल चौकशीचे आदेश..

जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास देतो.

पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तीव्र दुःख..

तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बचावकार्याचा आढावा घेतला. दुर्घटनाग्रस्तांना हवी ती सर्वतोपरी मदत करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

पाच लाखाची मदत जाहीर..

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चसुद्धा राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि दुःख व्यक्त केले, जखमींची चौकशी केली.

राज्यातील सर्व पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’..

तळेगावजवळील कुंडमळा येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व पुलांचे असे ऑडिट झाल्यानंतर ज्या ठिकाणी आवश्यक आहे, तेथील पुलांची दुरुस्ती त्वरित करावी, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे. या डागडुजीसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे शिंदे म्हणाले. तसेच सर्व पर्यटन स्थळांवर सुरक्षेची तरतूद करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button