एक हात मदतीचा… कीर्तीताई जाधव फाउंडेशनने जपली मानवता!
घरकुल मधील शॉर्टसर्किट मुळे आग लागली; सामाजिक कार्यकर्त्यांनी त्वरित मदत केली

पिंपरी | निगडी-घरकुल येथे दि. 14 जून 2025 रोजी रात्री 9:00 ते 9:30 दरम्यान इमारत डी 34, मोरया धाम सोसायटी, घर क्रमांक 604 मधील रफिक कुरेशी दापत्यांच्या घरात शॉर्टसर्किट मुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुरेशी कुटुंबीयांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले आणि त्यांना मोठे नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेने कुरेशी दापत्यांना मानसिक धक्का बसला. आपले घर जळताना पाहून त्यांची अवस्था अत्यंत वेदनादायक झाली. अशा संकटाच्या वेळी घरकुलमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला आणि मानवता जपली आहे.

हेही वाचा : ‘देवेंद्र फडणवीसांना राज-उद्धव यांना एकत्र येऊ द्यायचं नाही’; काँग्रेस नेत्याचा आरोप
किर्ती जाधव सोशल फाउंडेशनच्या प्रमुख कीर्तीताई मारुती जाधव आणि युथ फाऊंडेशनच्या सदस्यांनी त्वरित मदतीची घोषणा केली. युथ फाऊंडेशनच्या वतीने कुरेशी कुटुंबासाठी आर्थिक मदत केली गेली, ज्यामुळे त्यांना या आपत्तीवर मात करण्यात मदत झाली. घरकुलमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते या मदतीच्या कार्यात सहभागी झाले होते.
घरकूल एक कुटुंब भावना…
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव, शांताराम खुडे, राजाभाऊ जाधव, दशरथ शिंदे, कुणाल पळसकर, दत्ता धर्मे, अक्षय ओहोळ, संतोष माळी, सुदाम जाधव, तेजस कडलक, पोपट आरणे, धर्मे काकू आणि संपूर्ण कुरेशी कुटुंबीय यांच्या मदतीने दुर्घटनेनंतरच्या संकटावर ताबडतोब नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. घरकुल कुटुंबाच्या एकतेचे प्रतीक आणि एकमेकांच्या मदतीचे महत्त्व पुन्हा एकदा दिसून आले. समाजातील प्रत्येक व्यक्तीला अडचणीच्या वेळी मदतीचा हात देणे गरजेचे आहे हे या घटनेतून सिद्ध झाले आहे.





