ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Solapur : करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का देत जगताप यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने सोलापूर जिल्ह्याची राजकारणात चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे विकासाचा दृष्टिकोन असलेले नेतृत्व असून त्यांच्याच नेतृत्वाखाली धनुष्यबाण चिन्हावर करमाळा नगरपालिकेवर, पंचायत समितीवर आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत भगवा फडकवणार असल्याचा निर्धार माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केला. जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला फार मोठा लाभ होणार असल्याची शक्यता आहे.
हेही वाचा – मुंबई महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनिती; 12 शिलेदार मैदानात उतरवले
जयवंतराव जगताप यांच्या पक्षप्रवेशावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेनेचे करमाळा – माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सांगलीचे विठ्ठल पाटील, सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयवंत जगताप १९९० साली अपक्ष तर २००४ साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ते आमदार झाले होते. २०१९ साली विधानसभेला संजयमामा शिंदे यांना विजयी करण्यात व २०२४ साली नारायण पाटील यांना विजयी करण्यात जयवंत जगताप यांचा महत्त्वाचा वाटा आहे. माजी आमदार जगताप यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक देशभक्त स्व.नामदेवराव जगताप चार वेळा व चूलते स्व. अण्णासाहेब जगताप एक वेळेस आमदार होते.




