नेतृत्व, संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत: ‘आपत्कालीन कथा’

कंगना राणावत दिग्दर्शित आणि अभिनीत ‘इमरजन्सी’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी उत्कंठा होती. सुप्रसिद्ध लेखिका पुपुल जयकर यांच्या इंदिरा गांधींबद्दलच्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा, एका मोठ्या नेत्याच्या जीवनातील निर्णायक टप्प्यांचे चित्रण करतो. विशेषतः १९७५ ते १९७७ या २१ महिन्यांच्या काळातील आपत्कालीन स्थिती, तिची कारणे, परिणाम, आणि त्या काळातील प्रमुख नेत्यांच्या भावनिक व मानसिक स्थितीचा अभ्यास या चित्रपटातून मांडला आहे.

कंगना राणावत यांच्यामुळे भुमिकेला जिवंतपणा..
अभिनेत्री कंगना राणावत यांच्या अभिनय कौशल्यावर विश्वास होता. त्यांनी त्यांच्या भूमिकेत जिवंतपणा आणला आहे. मात्र, दिग्दर्शक म्हणून कंगनाने केलेली मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. हा चित्रपट तटस्थ दृष्टीने सादर करण्यात आला आहे. इतिहासातील एक वादग्रस्त काळ दाखवताना कुठलाही पूर्वग्रह न ठेवता, घडलेल्या घटनांना प्रामाणिकपणे पडद्यावर आणले आहे.
कंगना राणावत यांचे प्रभावी सादरीकरण
चित्रपटाचे पटकथा लेखक रितेश शहा, तन्वी केसरी पथुमुर्ती, आणि जयंत सिन्हा यांनी संवाद व लेखनामध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. तेत्सुवो नागटा यांनी उत्कृष्ट छायाचित्रण केले असून, विविध कालखंड आणि त्यातील बदल अचूकतेने कॅमेऱ्यात कैद केले आहेत. १९६० च्या दशकापासून १९८४ पर्यंतचा कालावधी दाखवताना त्या काळातील जीवनशैलीतील बदल अगदी प्रभावीपणे सादर केले आहेत.
जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी उत्तम कामगिरी
संगीतासाठी जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी उत्तम कामगिरी केली आहे, तर संजय चंद्रशेखर आणि श्रीकांत कृष्णा यांनी पार्श्वसंगीतात वेगळेपणा आणला आहे. चित्रपटातील गाणी, विशेषतः ‘सिंहासन खाली करो यह जनता आ रही है,’ प्रेक्षकांवर ठसा उमटवते. रामेश्वर एस. भगत यांनी संकलनामध्ये चित्रपटाच्या लयबद्धतेची उत्तम काळजी घेतली आहे. सुरुवातीस काही ठिकाणी दृश्ये तुटक वाटली, पण नंतरचा प्रवाह अखंड राहतो.
बाबू जगजीवन राम यांची भूमिका प्रचंड प्रभावी
कलाकारांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत बोलायचे झाले तर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांनी साकारलेली बाबू जगजीवन राम यांची भूमिका प्रचंड प्रभावी ठरली आहे. अनुपम खेर यांनी जयप्रकाश नारायण यांची भूमिका अतिशय समरसतेने साकारली आहे. श्रेयस तळपदे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा साधेपणा आणि करारीपणा सुंदरपणे उभा केला आहे. मिलिंद सोमण यांनी कर्नल सॅम माणेकशॉ यांची भूमिका डोळ्यातून साकारलेली करारी भावना व्यक्त केली आहे. महिमा चौधरी यांनी पुपुल जयकर यांची भूमिका अत्यंत संयतपणे साकारली आहे.
मानवी भावनांचा आणि संघर्षाचा अप्रतिम आविष्कार
‘इमरजन्सी’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर इतिहासातील एका निर्णायक काळाचा प्रामाणिक अभ्यास आहे. हा चित्रपट मानवी भावनांचा आणि संघर्षाचा अप्रतिम आविष्कार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अशा प्रकारच्या ऐतिहासिक चित्रपटांची नितांत गरज आहे. प्रत्येकाने वेळ काढून हा चित्रपट पाहावा, कारण तो केवळ इतिहास सांगत नाही, तर मानवी भावभावनांचे कंगोरेही उलगडतो.
लेखक: हर्षल आल्पे





