ताज्या घडामोडीमुंबई

पैसा झाला खोटा, बांबू बसला मोठा !

मुंबई आणि मुंबई परिसरातील ठाणे, कल्याण वगैरे परिसरात जो प्रचंड आर्थिक फटका नागरिकांना बसला आहे, तो संपूर्ण व्यवहार चिंताजनकच म्हणावा लागेल. एखादी उपटसुंभ कंपनी अचानक उगवते..दागिने किंवा पैशाच्या रूपाने नागरिकांना लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवते..किंबहुना, काही महिने तो लाभ सुद्धा देते..आणि विश्वास संपादन करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पोबारा करते, हे चित्र सूज्ञ आणि सुशिक्षित महाराष्ट्राला नक्कीच शोभा देणारे नाही.

झटपट श्रीमंत होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकाची जी धडपड सुरू असते, त्यातूनच असे प्रकार घडत असतात..मनी सर्क्युलेशनच्या योजना असोत, चीट फंडाचे प्रकार असोत, किंवा सदस्य बनवून त्यांना मोठ-मोठी बक्षिसे देण्याचे प्रकार असोत.. सुरुवातीला ‘ऑल इज वेल’ असते आणि पाच सहा महिन्यानंतर संयोजक गंडा घालून पळून गेलेले असतात हे लक्षात येते..

दुर्दैवाची गोष्ट, म्हणजे असे प्रकार वर्षानुवर्षे चालत आहेत, पण जनतेचे डोळे काही उघडत नाहीत.. झटपट श्रीमंती आणि सहजपणे मिळणारे पैसे, यामागे समाज धावत सुटतो, हे साधे समीकरण समोर ठेवून ही मंडळी या ना त्या स्वरूपात एखादी स्कीम काढून सावज हेरण्यात पटाईत असतात.. आणि त्यांनी लावलेल्या सापळ्यात सर्वसामान्य घरातील ‘सावजे’ अलगद जाऊन फसतात.. हे वर्षानुवर्षे घडत आहे, आत्ताही घडले आहे आणि काही वर्षानंतर पुन्हा घडणार आहे !

हजार कोटी पेक्षा मोठा गंडा, गंडणारे लाखावर!

मुंबईमधील दादर परिसरातील शिवाजी मंदिर भागात ‘टोरेस’ नावाच्या कंपनीने केलेला असाच एक मोठा घोटाळा नुकताच चव्हाट्यावर आला आहे. या जबरदस्त आर्थिक घोटाळ्यानं गोरगरीब,सर्वसामान्य, मध्यमवर्गीय नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. या कंपनीनं एवढी अफलातून कल्पना काढली होती, की दर आठवड्याला ११ टक्के व्याज दर परतावा देण्याचं आमिष दाखवून ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून घेतली. आधी सोने, हिऱ्याचे दागिने विकण्यापासून सुरुवात केलेल्या या कंपनीने गुंतवणुकीच्या माध्यमातून बक्कळ पैसा उभा केला.

सुरुवातीला त्यांनी ठरवल्याप्रमाणं आठवड्याला व्याजदर परतावा दिला गेला. त्यातून लाखो गुंतवणूकदारांचा अपेक्षेप्रमाणं विश्वास संपादन केला, पण, ( ठरल्याप्रमाणं ) अचानक या कंपनीच्या सर्व शाखांना टाळे लागल्याचं बघून गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. या कंपनीच्या शाखांच्या बाहेर फसवल्या गेलेल्या ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ‘टोरेस’च्या नावाखाली मुंबई, ठाणे व आसपासच्या भागात ज्या शाखा सुरू करण्यात आल्या होत्या, त्यातील जवळपास सव्वालाख ग्राहकांची फसवणूक झाल्याची बाब पोलीस तपासातून पुढे येत आहे. फसल्या गेलेल्या ग्राहकांचा हा आकडा पाच लाखापेक्षा मोठा असल्याचंही काहीजण सांगतात.

आपल्या लक्षात आलं असेलच की ‘टोरेस’ कंपनीच्या नावावर ग्राहकांची फसवणूक करणारा फंडा हा काही नवा प्रकार नाही. मुंबईत दोन महिन्यात पैसे दुप्पट करून देतो, असे सांगणाऱ्या अनेक खासगी कंपनीचा वन टू फॉरचा प्रकार गेल्या १५ ते २० वर्षांत मुंबईकरानी अनुभवला आहे. पण, त्यातून काहीही शहाणपण घेताना कोणी दिसत नाही, म्हणूनच असे प्रकार घडत असावेत. फसल्यानंतर मात्र सरकार आणि पोलीस यंत्रणेवर खापर फोडणाऱ्यांची संख्या प्रचंड असते, हे मुद्दाम सांगावसं वाटतं.

‘टोरेस’ कंपनीनं कसं गंडवलं आणि पैशासकट पोबारा केला ते एकदा लक्षपूर्वक पाहा. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२३ मध्ये ‘प्लेटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीनं ‘टोरेस’ ब्रँड अंतर्गत व्यवसायाला ( सॉरी, धंद्याला ) सुरुवात केली. दादरमध्ये ३० हजार चौरस फुटांचं भव्य ऑफिस सुरू केलं. त्यानंतर दादरसह ग्रँट रोड, नवी मुंबई, कल्याण आणि मीरा रोड या भागात शोरूम सुरू केले.

आणखी एक गंमतशीर बाब म्हणजे कंपनीनं ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी ठिकठिकाणी सेमिनार्स पण घेतले, त्यात सोने, चांदी आणि हिरे स्टोनवर गुंतवणूक केल्यास तुम्हाला दुप्पट रिटर्न मिळेल. एवढंच नाही, तर एका आठवड्याला पैसे मिळण्याचे वचनही देण्यात आले. गेल्या वर्षभरापासून मुंबईतील अनेक भागात याच योजनेच्या माध्यमातून डिसेंबरपर्यंत कंपनीने नियमित पैसे ग्राहकांना परत दिले होते.( हे पण आधी ठरलेलं असतं )

सहा लाखवाल्यांना मोठा परतावा

तर या ‘टोरेस’ कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना केवळ चार हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती. ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा देत असे. सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कंपनीकडून सहा टक्के व्याज देत होती. तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना ११ टक्के व्याज मिळत होते.

अनेकांना ते प्रामाणिकपणे मिळाले देखील! सुरुवातीला या कंपनीने उच्चभू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा काही ग्राहकांना दिला. ( हे गुंतवणूकदारांचा विश्वास बसण्यासाठी करावं लागतं ) मुंबईत गुंतवणुकीवर घसघशीत परतावे देणाऱ्या टोरेसच्या बिझनेस मॉडेलची सातत्याने चर्चा होत होती. यानंतर अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले, मात्र,( टार्गेट पूर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे ) कंपनीने आपला गाशा गुंडाळला आहे. हे सगळं ठरलेलं असतं तरी आपली भोळी भाबडी माणसं पुन्हा पुन्हा फसतात, हे दुर्दैव म्हणायचं का मूर्खपणा हेच कळत नाही !

थोडं या प्रकरणात डोकावलं, तर दादर शाखेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात सुमारे १३ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एकूण सगळ्या बंद शाखेतील ग्राहकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यास सुरू केली आहे. ‘टोरेस ज्वेलरी’ या नावाखाली आतापर्यंत तब्बल सव्वालाख लोकांची एक हजार कोटीची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पोलिसानी या प्रकारात कंपनीच्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अटक केली असली, तरी कंपनीच्या दोन संस्थापकानी विदेशात पलायन केले असून ते दोघे युक्रेनचे नागरिक आहेत. यातील काही जण रशिया, किंवा अझरबेजान येथील नागरिक असल्याचेही समजते. (आंधळ्या प्रमाणे पैसे गुंतवणारांच्या लक्षात असल्या गोष्टी कधीच येत नाहीत.)

काहींची दागिने, घर विकून गुंतवणूक

आता या परिस्थितीत पैसे मिळणे सोडाच; परंतु आकर्षक व्याजाच्या आमिषापायी अनेक कुटुंबावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. कंपनीवर विश्वास ठेवून दुप्पट रिटर्नच्या अपेक्षेने कुटुंबाचे दागिने गहाण ठेवून गुंतवणूक केली, काही जणांनी प्रसंगी घर विकून गुंतवणूक केली. पण, आता दागिने गायब झाले, अशी एका गुंतवणूकदाराची प्रतिक्रिया आहे.

दादर येथील भाजी विक्रेते प्रदीपकुमार वैश्य यांनी साडेचार कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली होती. वैश्यच्या दुकानासमोरच ‘टोरेस’ चे आलिशान कार्यालय होते. सुरुवातीला एक लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर आठवड्यात व्याज मिळाल्यानंतर त्याने कुटुंबीयांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले, अवघ्या सात महिन्यांत वैश्य यांनी सर्वाधिक साडेचार कोटी गुंतवले, त्यांच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पण,हाय रे दैवा म्हणत त्यांना हात चोळत बसावे लागणार आहे.

आता, थोडा पुढील विचार करू. काही दिवसात पोलीस आरोपीना पकड़तील, काही महिन्यानंतर प्रकरण शांत झाल्यावर आरोपींना जामीन मिळेल, मात्र, गुंतवणूकदारांना धामाची मूळ रक्कम पुन्हा मिळविण्यासाठी कोर्टाच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोर्टाचे निर्देश असे असतात की तुमच्या हाती काहीही लागत नाही. हे पुन्हा पुन्हा सांगण्याची वेळ येते.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, अशा आर्थिक घोटाळ्याला जसे लोभी गुंतवणूकदार जबाबदार आहेत, हे आपण मान्य करायला हरकत नाही. परंतु असे घोटाळे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनापासून शासकीय यंत्रणा सुस्त आहेत, याचा विचारही केला जावा. बँकांनीही किती व्याजदर द्यावे, याचे निकष रिझर्व्ह बँक ठरवते. त्यामुळे आठवड्याला, महिन्याला व्याजदर देणारी कंपनी आपल्या परिसरात कार्यरत असेल तर स्थानिक पोलिसांनी त्याकडे लक्ष द्यायला नको का?

आता ‘टोरेस’ कंपनीच्या गुंतवणूकदारांवर पश्चात्तापाची वेळ आली आहे. आम्हाला व्याज नको. पण आम्ही गुंतवलेले पैसे तेवढे परत करा, या मागणीसाठी त्याचा आता संघर्ष सुरू झाला आहे. एकूणच गुंतवणूकदारांची परिस्थिती ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे!’ अशी झाली आहे. याला जबाबदार कोण याचा विचार केलेला बरा ! एखाद्या गुहेमध्ये दबा धरून बसलेल्या सिंहाच्या तावडीत एखादं सावज सापडावं, अशीच ही परिस्थिती आहे ! नागरिकांनीच सावध राहायला हवं !

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button