महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९७व्या जयंतीदिवशी ‘फुले’ रीलिज
महात्मा आणि सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत लोकप्रिय बॉलिवूड कलाकार

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले आणि पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित बॉलिवूड सिनेमाची दीर्घकाळापासून प्रतिक्षा होती. ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त गेल्यावर्षी ‘फुले’ या हिंदी चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आणि आता सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी या चित्रपटाची रीलिज डेट जाहीर करण्यात आली आहे. महिलांना समान शिक्षण आणि समाजात सारखी वागणूक याकरता आयुष्यभर झटणाऱ्या या दाम्पत्याच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या चित्रपटात बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार काम करणार आहेत.
झी स्टुडिओज प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शनची निर्मिती असणाऱ्या ‘फुले’ सिनेमाची तारीख शुक्रवारी जाहीर करण्यात आली. समाजसुधारक महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आणि कार्यांवर आधारित हा चित्रपट यावर्षी ११ एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९७व्या जयंतीदिवशी ‘फुले’ रीलिज होणार आहे.
मुख्य भूमिका साकारणार हे लोकप्रिय बॉलिवूड कलाकार
‘फुले’ सिनेमात अभिनेता प्रतीक गांधी ज्योतिबांच्या भूमिकेत दिसणार असून, अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहे. या दोघांचे या सिनेमाच्या लूकमधील फोटोही याआधी समोर आले होते. ‘फुले’ सिनमाची रीलिज डेट जाहीर झाल्यानंतर प्रतीक आणि पत्रलेखा यांनीही याविषयी पोस्ट शेअर केली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते अनंत नारायण महादेवन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. झी स्टुडिओजने इन्स्टाग्रामवर या सिनेमाच्या रीलिज डेटचे पोस्टर शेअर केले. या पोस्टसाठी असे कॅप्शन देण्यात आले आहे की, ‘भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, डान्सिंग शिवा फिल्म्स, किंग्समन प्रॉडक्शन्स आणि आम्ही या चित्रपटाच्या जगभरातील रिलीजची घोषणा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. “फुले” हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी सिनेमागृहात रीलिज होईल, ज्यादिवशी ज्योतिराव फुले यांची १९७वी जयंती आहे.’




