‘राज्यात महाविकास आघाडीच्या १६० जागा निवडून येतील’; संजय राऊतांना विश्वास

Sanjay Raut | राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान २० नोव्हेंबर रोजी झालं. आता निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यात महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार येणार? याबाबत राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे दावे करणयात येत आहेत. यातच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार असा विश्वास व्यक्त केला.
संजय राऊत म्हणाले, की लोकसभेला मविआला १० जागाही मिळणार नाही, असं म्हटलं जात होतं, पण आम्हाला ३१ जागा मिळाल्या. सर्वेची ऐशी की तैशी. आम्ही काल एकत्र बसलो. महाराष्ट्रातील मतदान आणि मतदारांचा कौल यासंदर्भात जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई यांच्यात चर्चा झाली. १६० जागा आम्ही सहज जिंकतोय. हे (एक्झिट पोल) सर्वे कोणी आणि कसे केले. कसले हे एक्झिट पोल. आम्ही २६ तारखेला सरकार बनवतोय. एक्झिट पोल्सवर आमचा विश्वास नाही.
हेही वाचा – राज्य मंडळाकडून बारावी, दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उशाला नोटांची बंडले घेऊन झोपतात. त्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. गादीतही पैसे टाकून ठेवतात. त्यांनी अपक्षांना ५० ते १०० कोटी ऑफर द्यायला सुरुवात केलीय. याचा अर्थ आम्ही जिंकतोय. हे तुमच्या सर्वेवाल्यांना सांगा. त्यांना जिंकण्याची एवढी अपेक्षा असती तर त्यांनी आतापासून थैल्या पाठवल्या नसत्या लहान पक्ष आणि अपक्षांना, असं संजय राऊत म्हणाले.
प्रकाश आंबेडकर हे लोकशाहीला मानणारे नेते आहेत. त्यांचे ५० -६० आमदार निवडून आले आणि आम्हाला त्यांची गरज लागली तर आम्ही नक्कीच त्यांचा पाठिंबा घेऊ. महाराष्ट्रातील ते महत्त्वाचे नेते आहेत. आम्ही नक्की त्यांचा विचार करू. लोकसभेलाही आम्ही प्रयत्न केला. विधानसभेसाठीही प्रयत्न केला. आमची सत्ता येतेय, त्यामुळे आंबेडकर आमच्याबरोबर येतील, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.
भाजपाचा हा डाव आहे. त्यांनी आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिला आहे. उद्या निकाल लागेल. २४-२५ तारखेला आमदार मुंबईत पोहोचतील, तिन्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठका होतील. विधिमंडळ पक्षाचे नेते ठरवले जातील. सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. राज्यात राजभवनाच्या शाखाच्या आहेत. कारभार भाजपाचा असल्याने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जाईल. आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी ते अडथळे आणतील. आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करून. सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असंही संजय राऊत म्हणाले.





