‘राज ठाकरेंच्या मनात काय ते मला कळलंच नाही’; सदा सरवणकर यांचं वक्तव्य

Sada Sarvankar | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंसाठी काल 10 नोव्हेंबररोजी प्रभादेवीमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. जो कुणाचाच नाही झाला, त्याच्याबद्दल काय बोलणार असं म्हणत राज ठाकरे यांनी सदा सरवणकरांवर निशाणा साधला. याबाबत सदा सरवणकर यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
सदा सरवणकर म्हणाले, की राज ठाकरे आणि माझी थेट चर्चा झाली नाही. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असेल. मला एकनाथ शिंदेंनी सांगितलं की राज ठाकरेंना जाऊन भेटा आणि ते सांगतील तसं वागा, मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारली. काय त्यांच्या मनात होतं ते काही समजलं नाही. त्यांनी सांगितलं की ज्यांना उभं राहायचं असेल त्यांनी उभं राहा.
हेही वाचा – पुणे-मुंबई प्रवास आता ‘सुपर फास्ट’ : मुंबई-बंगळुरू मार्गावरील प्रवाशांचा दीड तासांचा वेळ वाचणार!
शिवाजी पार्क मैदानावर राजकीय पक्षाच्या किती सभा व्हाव्यात मेरिटवर ही संमती दिली जाते. तिथे काही पक्षीय राजकारण नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनी आम्ही तिथे जाऊन अभिवादन करतो. आमच्यासाठी ते स्फूर्ती स्थळ आहे, असंही सदा सरवणकर म्हणाले.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
बाळासाहेब ठाकरे हयात असताना ही व्यक्ति काँग्रेसमध्ये गेली, काँग्रेसमध्ये आमदारकीला पराभूत झाली, त्यानंतर पुन्हा शिवसेनेत आली, पुन्हा एकनाथ शिंदे गेल्यावर त्यांना शिव्या दिल्या आणि नंतर त्यांच शिंदेंबरोबर जाऊन बसले असं म्हणत सदा सरवणकर यांच्यावर नाव न घेता राज ठाकरेंनी हल्लाबोल केला.





