दिवाळीच्या सणानिमित्त रेडिमेड फराळाच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ
यंदाच्या वर्षी फराळाच्या वस्तूंमध्ये काही प्रमाणात दरांमध्ये वाढ

नांदेड : दिपवाळी सण मोठा…नाही आनंदाला तोटा’ असे म्हटले जाते. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. दिवाळीनिमित्त शहरातील सर्वच बाजारपेठा कपडे, गृह सजावटीच्या वस्तू, फटाके, रांगोळी, आकाशकंदील तसेच इतर साहित्यांनी फुलून गेल्या आहेत. सर्वत्र नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
दिवाळी म्हटलं की घरोघरी चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे, चकली, गुलाबजामून आणि इतर फराळाच्या चविष्ट पदार्थांची रेलचेल असते. दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच घरोघरी लगबग असते ती फराळ बनविण्याची.
मात्र, सध्याच्या धावपळीच्या काळात फराळाचे एवढे पदार्थ बनविण्यासाठी अनेक महिलांना इतर दैनंदिन कामाच्या व्यापातून पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे रेडिमेड फराळाला मागणी वाढली असल्याचे चित्र आहे. यंदाच्या वर्षी फराळाच्या वस्तूंमध्ये काही प्रमाणात दरांमध्ये वाढ झाली असली तरी तयार फराळाची खरेदी मात्र जोरात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शहरातील विविध स्वीट मार्ट, हलवा यांच्या दुकानांमध्ये फराळ खरेदीसाठी देखील गर्दी वाढली आहे.
नांदेड शहरात व्यावसायिक व नोकरदार महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. तसेच विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि मुलांचे संगोपन, दैनंदिन कामे यामुळे महिलांना घरी फराळ बनवायला वेळ मिळत नाही. यामुळे महिलांचा फराळाचे पदार्थ विकत घेण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. पण यामध्ये सुद्धा चव व गुणवत्तेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे ज्या महिला घरगुती पद्धतीने दिवाळीचा फराळ बनवतात त्यांना प्राधान्य मिळते.
दिवाळी म्हटलं की आमच्या घरातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आतुरता असते ती बनवण्यात येणाऱ्या फराळाच्या विविध चविष्ट आणि गोड पदार्थांची. दैनंदिन कामाच्या व्यस्ततेमुळे आम्हाला पूर्ण पदार्थ घरी बनविता आले नाही, तरी थोडेफार घरी आणि काही पदार्थ बाजारपेठेतून विकत आणले आहेत. चिवडा, अनारसे, करंजी, चकली, गुलाबजाम असे पदार्थ घरीच तयार करतो. बेसन लाडू, शेव, फरसाण आधी पदार्थ आम्ही बाजारपेठेतून विकत आणले आहेत.
– शिवकांता दुस्सलवार, गृहिणी नांदेड.
मी तीन वर्षांपासून मसाले, चटणी, मोदक, दिवाळी फराळ तयार करते. यात वापरले जाणारे साहित्य उच्च प्रतीचे असतात. यंदा दिवाळीनिमित्त माझ्याकडे विविध पदार्थांची ७० ते ८० किलोच्या आगाऊ मागणीची नोंद झाली आहे. सर्वच पदार्थ चविष्ट व उच्च प्रतीची देत असल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.
– साक्षी पांडे, नांदेड





