Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

विदर्भातील मुद्द्यावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर; भाजप नेते आशिष देशमुख यांचा आरोप

Ashish Deshmukh | विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत सामना होण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. अशातच भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

आशिष देशमुख म्हणाले, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तसेच त्यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आज २२ वर्षानंतर १ हजार ४४४ कोटींची वसूली त्यांच्याकडून करण्याच्या संदर्भात सहकार विभागाने आणि सहकार मंत्र्यांनी काही दिवसांपासून दिरंगाई केली. त्या विरोधात नागपूरच्या रामटेकमध्ये शेतकऱ्यांचा आणि खातेधारकांचा भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. आता मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा हीच विनंती आहे की, सातत्याने तांत्रिक व न्यायालयीन अडचणी दाखवत सुनील केदार वेळ काढत आहेत. मात्र, तरीही आपण आदेश का देत नाहीत? माझी वळसे पाटलांना विनंती आहे, आपण यासंदर्भातील आदेश द्यावा आणि १ हजार ४४४ कोटींची वसूली करावी.

हेही वाचा    –    लाडकी बहीण नव्हे, ‘मुख्यमंत्री’ लाडकी बहीण योजना म्हणा; शंभूराज देसाई यांचं विधान 

मी दुसरं हे देखील सांगतो की, मंत्री धनंजय मुंडे हे कृषीमंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत. मात्र, विदर्भातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना अद्याप भरपाई देण्यात आली नाही. २०२१ ची नुकसान भरपाई अद्याप बाकी आहे. यासंदर्भात मी त्यांच्याबरोबर बैठकीचे आयोजनही केले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी ही बैठक रद्द केली. अनिल देशमुख यांच्या दबावानुसार मंत्री धनंजय मुंडे आणि सुनील केदारांच्या दबावावर दिलीप वळसे पाटील विदर्भातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. वेळकाढूपणा करत आहेत. राजकारण करत आहेत. हे होत असावं असं माझं मत आहे, असा गंभीर आरोप आशिष देशमुख यांनी केला.

सुनील केदार यांचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी जुने संबंध आहेत. तसेच अनिल देशमुख यांचेही मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जुने संबंध आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे दोन्हीही मंत्री विदर्भातील शेतकऱ्यांकडे कानाडोळा करत आहेत. शेतकरी अडचणीत असतानाही हे दोन्ही मंत्री कार्यवाही करण्यास टाळाटाळ करत आहेत, असंही आशिष देशमुख म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button