सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला, मनोज जरांगे पाटील यांचं पुढचं पाऊल काय?

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ संपला आहे. काल दसरा मेळाव्यात भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणार असं आश्वासन दिलं आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तसंच ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचं आश्वासन केलं. मी कार्यक्रमात असल्याने पाहिलं नाही. आमचा दिवसरात्र कार्यक्रम सुरु आहे. मला बघायला वेळ मिळाला नाही. पण त्यांनी छत्रपतींची शपथ घेतली असेल तर ही समाजाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण हवं आहे.
हेही वाचा – लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढणार, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मार्चपर्यंत तयार होईल
आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मान ठेवला. आम्ही ४० दिवस दिले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देवून आमचा सन्मान करावा. कारण ते शब्दाला पक्के आहेत, अशी मराठा समाजात भावना झाली आहे. त्यांनी त्या शब्दाला जागावं. त्यांनी आता आरक्षण द्यावं. आम्ही मराठे आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीत.आंदोलन थांबवण्याचा काहीच प्रश्नच नाही. त्यांनी आमच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला. आम्ही मोठं मन दाखवून ४० दिवसांचा वेळ दिला. आम्ही १० दिवस जास्त दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली असेल तर चांगली गोष्ट आहे. पण आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.





