महिंद्र गायकवाड-सिकंदर शेख पुन्हा कुस्तीच्या मैदानात भिडणार?

शिवछत्रपती पुरस्कार विजेते वस्ताद संजय भोकरे यांनी केले जाहीर
सांगली : पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर वादाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र केसरीच्या उपात्या फेरीत महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात सामना रंगला. यासामन्यात पैलवान सिकंदर शेखवर अन्याय झाल्याचा सूर सोशल मीडियावर उमटला आहे. त्यानंतर पंचांना धमकी दिल्याचा प्रकार देखील उघडकीस आला होता. या वादावर पडदा टाकण्यासाठी लवकरच दोघांमध्ये पुन्हा एकदा कुस्ती होणार आहे.
पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सांगलीत मातीतील कुस्ती आयोजित करण्यात येणार असल्याचे अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे वस्ताद यांनी जाहीर केले आहे. सिकंदर शेखने तयारी दर्शवली असून महेंद्र गायकवाड यांच्याशी बोलणी सुरू आहे असं सांगितले आहे.
पैलवान शेख आणि गायकवाड या दोघांमध्ये सांगलीत मातीवर पुन्हा कुस्ती झाल्यास सध्या सुरू असलेल्या वादावर तोडगा निघेल, असा विश्वास वस्ताद संजय भोकरे यांनी व्यक्त केला आहे.






