शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर : मुख्यमंत्र्यांच्या घरात झालेल्या चर्चेतील गोष्टी बाहेर, अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली नाराजी

सिल्लोड : भाजपसोबत सरकार स्थापन करुन सहा महिने उलटत नाही तोच शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरात झालेल्या चर्चेतील गोष्टी बाहेर येत असल्याने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी थेट नाव घेतलं नसलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे सांगितले आहे. इतकंच नाही तर आपल्याविरोधात रचण्यात आलेल्या कटात पक्षातील नेता सहभागी असू शकतो असं सूचक विधानही त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केलं आहे. सिल्लोड येथील कृषी प्रदर्शनस्थळी ते बोलत होते.
अब्दुल सत्तार यांचा रोख कोणाकडे?
तुमच्या विरोधातील कटात कोण सहभागी आहे असं विचारलं असता ते म्हणाले “आमच्या पक्षातील असतील, काही हितचिंतक असतील किंवा विरोधी पक्षात ज्यांच्या खूर्च्या रिकाम्या झाल्या तेही असू शकतात”. त्यामुळे सत्तार यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरात झालेली चर्चा बाहेर येत असल्याचं सांगत नाराजी जाहीर केली. “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरात चर्चा करत होतो. ती चर्चा बाहेर आली तेव्हा मी त्यांना चुकीच्या बातम्या बाहेर येत असल्याचं सांगितलं. मी कोणाचंही नाव घेतलं नाही. त्याचा तपास मुख्यमंत्री करणार आहेत, त्यांच्याकडे मी तक्रार केली आहे”.
“विरोधी पक्षात माझे फार हितचिंतक आहेत. माझ्यासारख्या अल्पसंख्यांक समाजाच्या माणसाला इतकं महत्वपूर्ण खातं कसं दिलं याबद्दल काही लोकांच्या मनात खदखद आहे. पण ते त्याचं काम करतात मी माझं काम करतो,” असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना मी राष्ट्रवादी पक्षात आलो नाही याची चीड आहे का? अशी विचारणा केली. मी लोकांसाठी लढत आहे, भांडत आहे, काम करत आहे. काही लोक मात्र फक्त उद्योगपतींसाठी काम करतात असा आरोपही त्यांनी केला.




