वाईन शॉप मालकाला बंदुकीचा धाक दाखवून, पाच लाख रुपये लुटले ; डोंबिवली जवळील सोनारपाडा येथील प्रकार

वाईन शॉप मालकाला बंदुकीचा धाक दाखवून, पाच लाख रुपये लुटले ; डोंबिवली जवळील सोनारपाडा येथील प्रकार

कल्याण | शिळफाटा रस्त्यावरील सोनारपाडा येथे एका वाईन शॉप मालकाच्या अंगावर मिरचीपूड फेकून आणि नंतर त्याला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या जवळील ५ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम, दोघांनी लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, किशोरकुमार काररा हे गोळवली येथील रिजन्सी अनंतंम संकुलात राहतात. किशोरकुमार यांनी उल्हासनगर येथील रहिवासी बिशम मंगवानी यांच्या मालकीचे कल्याण शीळफाटा रस्त्यावरील वाईन शॉप दुकान चालवायला घेतले आहे. ते रोज या दुकानात सकाळी दहा वाजता येऊन रात्री दहा वाजता दुकान बंद करून निघून जातात.

किशोरकुमार हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे दिवसभरातील झालेल्या उलाढालीची ५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम आपल्या बॅगेत भरून दुचाकीवरून आपल्या कामगारासह रात्री साडेदहा वाजता गोळवली येथे जात होते. दरम्यान, किशोरकुमार यांची दुचाकी शीळफाटा रस्त्यावरील सोनारपाडा येथील नेकणी पाडा बस थांबा जवळ येताच, दोन जण किशोरकुमार यांच्या दुचाकी समोर अचानक आले. त्यानी किशोरकुमार यांच्या दिशेने मिरची पूड फेकली. आपणास चोरट्यांनी अडवले आहे हे लक्षात येताच किशोरकुमार यांनी दुचाकी वेगाने पळवली. पण ते दोघेही दुचाकीस्वार किशोरकुमार याना पुन्हा आडवे झाले. त्यानंतर त्यांनी किशोरकुमार यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि पळण्याचा प्रयत्न केला तर गोळी झाडण्याची धमकी दिली. याचेवेळी त्यांनी किशोर कुमार यांच्या जवळील पैशांची बॅगही हिसकावली आणि घटनास्थळावरून पोबारा केला. किशोरकुमार यांनी चोरट्यांचा पाठलाग केला पण ते अंधाराचा फायदा घेत कल्याणच्या दिशेने पळून गेले.

किशोर कुमार यांनी ही माहिती दुकान मालक मंगवानी यांना दिली. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *