अभय योजनेद्वारे 109 कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत !

पुणे | महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाची थकबाकी वसुल होण्यासाठी स्थायी समितीने मिळकतकराची एक कोटी रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्यांसाठी ‘अभय योजना’ राबविण्यास मंजुरी दिली आहे. या अभय योजनेतून महापालिकेला 109 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तर चालू आर्थिक वर्षात महापालिकेला तब्बल 1471 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
महापालिकेने निवासी मिळतीसाठी अभय योजना लागू केली होती. 1 कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारासाठी ही योजना राबवबयात येत आहे. या योजनेची मुदत 26 जानेवारी पर्यंत होती. ती आता वाढवून 28 फेब्रुवारी करण्यात आली आहे. मात्र त्यावर अजून प्रशासनाकडून अंमल करण्यात आलेला नाही.दरम्यान 7 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत अभय योजनेतून महापालिकेला 109 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तर चालू आर्थिक वर्षात महापालिकेला तब्बल 1471 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. अभय योजनेचा लाभ 48460 लोकांनी घेतला आहे. तर आतापर्यंत 8 लाख 46 हजार 498 लोकांनी 1471 कोटींचा टॅक्स जमा केला आहे. मागील वर्षी वर्षभरात 7 लाख 80 हजार 357 लोकांनी 1366 कोटींचा टॅक्स जमा केला होता.





