आज उडणार राजकीय धुरळा! चार पक्षाचे चार नेते एकाच मंचावर

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील चार महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण होणार असून यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेय. त्यामुळे आज राजकीय खडाजंगी पाहायला मिळणार हे नक्की.
शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. नऊ फूट उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला. या सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपण केले जाणार आहे.
मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा असावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव आठ वर्षांपूर्वी पालिकेत शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. मात्र हा पुतळा शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात की, शिवाजी पार्क परिसरात उभारायचा यावरून शिवसेनेमध्ये मतभेद होते.
याच काळात जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे पुतळा उभारण्याचे निश्चित झाले. परंतु हा प्रस्तावही बारगळला. अखेर गेट वे ऑफ इंडिया येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटात हा पुतळा उभारण्याचे ठरवण्यात आले. तसा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व अन्य आदी उपस्थित राहणार आहेत.




