क्रिकेटपटू इरफान पठाणचं ‘COBRA’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण! पाहा टीजर

भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण आता आयुष्यातील नवीन इनिंग सुरू करत आहे. इरफान पठाण सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. इरफान पठाण दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रम बरोबर ‘कोब्रा’ या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे. सेव्हन स्क्रीन स्टुडिओच्या या सिनेमाची निर्मिती ललित कुमार यांनी केली आहे. शनिवारी (09 जानेवारी) या सिनेमाचा टीजर प्रदर्शित झाला असून इरफानच्या चाहत्यांमध्ये याबाबत मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे.
सेव्हन स्क्रीन स्टुडिओने कोब्रा सिनेमाच्या टीजरबाबत एक ट्वीट केले आहे. अजय ज्ञानमुथू यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून हा सिनेमा तमिळ, तेलूगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. टीजरमध्ये इरफानच्या अभिनयाची झलक पाहायला मिळते आहे. त्याचा एक नवा अवतार या 1 मिनिट 47 सेकंदाच्या टीजरमध्ये पाहायला मिळतो आहे. या सिनेमातील ‘थम्पी थुल्ल’ हे गाणं देखील काही दिवसांपूर्वी रीलिज करण्यात आलं होतं. या गाण्याबाबतही चांगल्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. भारतासाठी इरफानने 29 कसोटी सामने, 120 वनडे मॅच आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत.





