पंतप्रधान मोदी आज साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद
नवी दिल्ली – देशातील कोरोना रुग्णसंख्येचा दैनंदिन आलेख वेगाने वाढताना दिसतोय. लॉकडाऊनच्या काळातील बंधने शिथिल केल्यानंतर देशात कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होऊ लागला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणारी ही बैठक दोन भागांत घेण्यात येणार आहे. पहिले सत्र हे सकाळी 10.30 ते 12 या वेळेत असेल. यामध्ये पंतप्रधान कोरोनामुळे त्रस्त असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यात दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा समावेश आहे. त्यानंतर उर्वरित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. दुसरी बैठक ही कोरोना लसीच्या वितरणाच्या मुद्द्यावर होणार असून या दोन्ही बैठकांमध्ये काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तिथे पुन्हा लॉकडाऊन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.





