रामदास आठवले कंगनाच्या घरी, RPI चा कंगनाला पाठिंबा

मुंबई | “रिपब्लिकन पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पाठिशी आहेत. मुंबई ही सर्व पक्षाचा आणि सर्वांची आहे. मुंबईत राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. कंगनाला मुंबईत घाबरण्याची गरज नाही,” अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. नुकतंच रामदास आठवले यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात केलेली टीका, शिवसेनेवर साधलेले शरसंधान, मुंबई महापालिकेने ऑफिसवर केलेली कारवाई यांसह इतर अनेक गोष्टींवर त्यांच्यात चर्चा झाली.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर फार गर्व आहे. माझं सौभाग्य आहे की तुम्ही आमच्या घरी आलात. तुमचा आशिर्वाद असू द्या. तुम्ही हिमाचलमध्ये कधी आलात तर तिथे आदरातिथ्य करण्याचा मला संधी द्या.” असे कंगना आठवलेंच्या भेटीदरम्यान म्हणाली. तर शिवसेना फार अग्रेसिव्ह राहणार नाही, असे आठवले म्हणाले. त्यानंतर शिवसेना बॅक फूटवर येईल, असा दावा कंगनाने केला आहे.
गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी कंगनाची भेट घेण्याचा निर्णय घेतला. कंगनाच्या राहत्या घरी खार इथे त्यांनी भेट घेतली. कंगना आणि रामदास आठवले यांच्यात दीड तास चर्चा सुरु होती.





