राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पिकांचे पंचनामे करून घेण्याचे आदेश देण्यात बाबत व तात्काळ राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत देण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि आपत्ती व्यवस्थापन तथा मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे केली आहे.
माजी खासदार बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यातच अतिवृष्टीमुळे सोयाबीन, घेवडा, बटाटा इत्यादी पिकांचे नुकसान होऊन महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील भागांमध्ये शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. आज, आपण जर पाहिले तर शेतकरी हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतो, त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच असतो, जर त्यांना मदत निधी वेळेत भेटला नाही, तर त्यांची अवस्था बिकट होईल.
त्याचा त्यांच्या उपजीविकेवर ही परिणाम होईल, यामुळे शासनाने वेळीच दखल घेऊन शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी झालेल्या भागांमधील पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मदतनिधी शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावा. तसेच, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी खात्याला आदेश देऊन शेतकऱ्यांच्या पिक विम्याचा फॉर्म भरून घ्यावा, त्याअंतर्गत त्यांना पिक विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.




