कोरोनाबाधीत रुग्णाला तत्काळ उपचार देण्यासाठी पालिकेचे ‘मिशन टेस्टिंग’
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
आता अवघ्या अर्धा तासात कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त होणार असून त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘मिशन टेस्टिंग’ अभियान हाती घेतले आहे. याकरिता ‘रॅपिड टेस्टिंग’च्या एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे करोनाची लक्षणे आढळणा-या रुग्णावर तात्काळ निदान आणि उपचार शक्य होणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने अक्षरश: विळखा घातला आहे. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. शहरातील तब्बल दीड हजार रुग्ण झोपडपट्यांमधील आहेत. आजमितीला 2 हजार 558 रुग्ण शहरात सापडले आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने आता ‘मिशन टेस्टिंग’ हाती घेतले आहे.
महापालिकेने एक लाख रॅपिड टेस्ट किट्स मागविल्या आहेत. या किटच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांतील नागरिकांची अँटीजेन तपासणी करता येईल. अँटीजेन तपासणीमुळे किती लोक निगेटीव्ह आणि पॉझिटीव्ह आहेत, याचा अंदाज बांधता येवू शकेल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे.
साधारण साडेचारशे रुपये त्याचा दर ठरविला आहे. त्यामुळे जलद स्क्रिनिंग करुन देता येईल. ती कन्फर्म टेस्ट नाही. त्यासाठी त्यांची पुन्हा तपासणी करावीच लागेल. पण, निगेटीव्ह कोण आहेत. ते लवकर समजेल आणि कोरोनाची लागण झालेले किती रुग्ण आहेत, त्याचा अंदाज येऊन त्यांच्यावर तत्काळ उपचार केले जातील, असेही हर्डीकर म्हणाले आहेत.
या तपासणी प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात करत आहोत. त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. रॅपिड टेस्टिंगद्वारे अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल येतो. त्यामुळे नेमके कोणावर उपचार करायचे आहेत, हे लक्षात येईल. त्या पद्धतीने नियोजन करत आहोत. या माध्यमातून कर्मचा-यांचेही सर्व्हिलन्स वाढविले जाईल, असेही आयुक्त हर्डीकर यांनी म्हटले आहे.





