नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात एक भारतीय ठार, २ जखमी

नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात एक भारतीय ठार, २ जखमी

नवी दिल्ली | चीनच्या आहारी गेलेल्या नेपाळने वाद निर्माण करुन भारत-नेपाळ सीमेवर तणाव निर्माण केला आहे. नेपाळ पोलिसांनी भारताच्या हद्दीतील जानकी नगर भागाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात शेतात काम करत असलेल्या विकेश कुमार राय (२५) यांचा मृत्यू झाला. नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात उमेश राम आणि उदय ठाकूर हे दोघेजण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणात नेपाळ पोलिसांनी एका भारतीय नागरिकाला ताब्यात घेतले आहे. बिहार पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रीय सशस्त्र सीमा दलाचे अधिकारी नेपाळ पोलिसांच्या संपर्कात आहेत. भारताचे सशस्त्र सीमा बल सतर्क झाले आहे. भारत-नेपाळ सीमेवर दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.  स्वातंत्र्याआधी ब्रिटीश इंडियाच्या आणि स्वातंत्र्यानंतर भारत सरकारच्या ताब्यात असलेल्या लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी या ठिकाणांवर नेपाळ सरकारने दावा केला आहे.

आपला दावा आणखी मजबूत करण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा ओली यांनी नेपाळच्या संसदेत देशाचा नवा नकाशा मंजुरीसाठी सादर केला आहे तसेच भारताशी जमीन परत मिळवण्यासाठी चर्चेची तयारी दाखवली आहे. नेपाळ सरकारने भारत-नेपाळ सीमेवरील लष्करी बंदोबस्तात वाढ सुरू केली आहे. नेपाळचे २२ जिल्हे भारताशी जोडलेले आहेत त्यामुळे रस्ते मार्गाने भारतातून नेपाळला सहज जाता येते. पण नेपाळ सरकारच्या निर्णयामुळे आता फक्त २० ठिकाणांहून नेपाळी लष्कराच्या परवानगीनंतरच भारतातून आलेल्या व्यक्तीला नेपाळमध्ये प्रवेश मिळणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *