तणावपूर्ण वातावरणातून लोकांना बाहेर काढण्यासाठी अभिनेते विजय पटवर्धन यांचा भन्नाट प्रयोग

सतत वाढत जाणारा कोरोना विषाणू बाधितांचा आकडा, त्यात कोरोनामुळे हेणारी मृतांची संख्या, चिंतेत वाढ करणारीच परिस्थिती आहे, यातून मन दुसरीकडे वळवण्यासाठी लोक पर्याय शोधत आहेत. थोडावेळ का होईना यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी अभिनेते विजय पटवर्धन यांनी लॉकडाऊनच्या काळात नवा प्रयोग केला आहे.
विजय पटवर्धन आणि त्यांच्या पत्नीनं काही छोटे विनोदी व्हिडिओ तयार केले आहेत. घराबाहेर न पडता आणि घरातील सदस्यांच्या मदतीनं विजय पटवर्धन यांनी तयार केलेले विनोदी व्हिडिओ हे सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत. ‘सतत बातम्या बघून कंटाळा, नैराश्य येण्यापेक्षा लोकांनाही थोडं हसू दे असं म्हणत आम्ही नेहमीचेच विनोद वेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर आणले. काही विनोद नाटकातले होते, तर काही लोकांनींही सुचवले आणि असं करता करता हा प्रयोग यशस्वी झाला’ असं विजय पटवर्धन म्हणाले.
‘सततच्या बातम्या बघून नकारात्मकता येत असेल तर काही तरी वाचा, घरी रहा, सुरक्षित राहा आपल्यामुळे कोणाला कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही आणि कोणामुळे आपल्याला कोरोना होणार नाही याची काळजी घ्या’, अशी विनंतीही त्यांनी केली.





