#CoronaVirus: Good news 103 वर्षीय आजीने केली करोनावर मात

सध्या करोना व्हायरसने संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. संपर्कातून पसरणाऱ्या या आजाराचा वृद्ध व्यक्तींवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. तसेच करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशातच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. इराणमधील एका वृद्ध महिलेने करोनावर मात केली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार इराणची राजधानी तहरानपासून १८० किलोमीटर लांब असलेल्या सेमनान येथील दवाखान्यात या वृद्ध महिलेला करोनाचा संसर्ग झाल्याने दाखल करण्यात आले होते. या महिलेचे नाव अद्याप समोर आलेले नाही पण या महिलेचे वय १०३ वर्षे आहे. ‘या वृद्ध महिलाने करोना व्हायरसवर मात केली आहे आणि आता त्यांना घरी सोडण्यात आले आहे’ असे सेमनान यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सचे प्रमुख नविद दयानी यांनी म्हटले आहे.
करोनावर मात करणारी ही पहिली महिला नाही. यापूर्वी दक्षिण-पूर्व केरमान येथे राहणाऱ्या ९१ वर्षीय वृद्ध महिलाने देखील करोनवर मात केली होती. १०३ वर्षीय या वृद्ध महिलेला उच्च रक्तदाब आणि अस्तमा होता. सुरुवातीला तीन दिवस त्यांनी करोनावर निट उपचार घेतले.
इराणमध्ये करोना व्हायरसचा पहिला रुग्ण १९ फेब्रुवारी रोजी सापडला होता. तसेच या आजाराने जगात साडे तीन हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. संपर्कातून पसरणारा हा संसर्गजन्य आजार थांबवण्यासाठी शाळा, कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच अनेकांना घरुन काम करण्यास सांगितले जात आहे.




