ICC ची भारतीय संघावर तिसऱ्यांदा कारवाई…

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दोन धक्के बसले. प्रथम फलंदाजी करताना ३४७ धावांचा डोंगर उभा करून देखील भारताचा पराभव झाला. या पराभवानंतर आयसीसीच्या कारवाईला भारतीय संघाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे न्यूझीलंड दौऱ्यात तिसऱ्यांदा आयसीसीने भारतीय संघावर कारवाई केली आहे. आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी भारतीय संघाला निश्चित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल दंड केला…
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत ३४७ धावा करून देखील भारताचा ४ विकेटनी पराभव झाला. सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरने १०३ धावांची शतकी खेळी केली तर लोकेश राहुलने नाबाद ८८ आणि कर्णधार विराट कोहलीने ५१ धावा केल्या. भारताने ४ बाद ३४७ धावा केल्यानंतर न्यूझीलंडने ११ चेंडू आणि ६ गडी राखून विजय मिळवला. पहिल्या सामन्या धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल आयसीसीने भारतीय संघाला दंड केला आहे. यावेळी आयसीसीने भारतीय संघाला सामन्यातील मानधनाच्या ८० टक्के इतका दंड केला आहे. न्यूझीलंड दौऱ्या धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल भारतीय संघाला दंड होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी टी-२० मालिकेत दोन वेळा भारतीय संघाला याच कारणासाठी दंड झाला होता.
भारतीय संघाने नियमीत वेळेपेक्षा चार षटके अधिक वेळ घेतला. आयसीसीचा नियम २.२२ नुसार निश्चित वेळेनंतर जितकी षटके टाकली जातात अशा प्रत्येक ओव्हरसाठी २० टक्के दंड केला जातो.




