आक्षेपार्ह प्रसंग वगळा अन्यथा ‘दबंग 3’ वर बहिष्कार, हिंदु संघटनांचा इशारा

- दादर (मुंबई) येथे दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदु संघटनांची निदर्शने !
मुंबई | महाईन्यूज
20 डिसेंबरला प्रदर्शित होणार्या दबंग 3 या हिंदी चित्रपटात साधूंना गॉगल घालून व हातात गिटार घेऊन हिडिस अन् आक्षेपार्ह पद्धतीने नाचतांना दाखवले आहे. देवतांचाही अवमान करण्यात आला आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतरही नाचणारे साधू खोटे असल्याचे सांगत सलमान खान यांनी चित्रपटातील सदर दृश्याचे समर्थन केले आहे. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन आम्ही कदापी सहन करणार नाही. चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळला नाही, तर ‘दबंग ३’ वर बहिष्कार घालण्यात येईल, अशा इशारा समस्त हिंदु संघटनांनी दादर येथील आंदोलनाच्या वेळी दिला.
दबंग ३ चित्रपटातून हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या अवमानाच्या विरोधात 8 डिसेंबर रोजी दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाजवळील स्वामी नारायण मंदिराजवळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनांनी हा निर्णय घेतला. या आंदोलनात हिंदू राष्ट्र सेना, बजरंगदल, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, वज्रदल, हिंदु जनजागृती समिती, शिवपुत्र प्रतिष्ठान, श्रीराम-गणेश मित्रमंडळ (धारावी), सनातन संस्था, रणरागिणी शाखा आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.





