Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

हिंगोलीत पत्रकारांसाठी म्हाडाची घरकुल योजना; क्रीडा संकुल आणि नानाजी देशमुख स्मारकासाठीही जागा उपलब्ध होणार

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश; तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी जमीन उपलब्धतेचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

मुंबई : हिंगोली शहरातील पत्रकार आणि दुर्बल घटकांसाठी म्हाडामार्फत घरकुल योजना राबविण्यासह जिल्हा क्रीडा संकुल आणि नानाजी देशमुख स्मारक उभारण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तातडीने प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त उपक्रमही प्रभावीपणे सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मंत्रालयात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या तीनही प्रकल्पांसाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून जमीन उपलब्धतेची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर चर्चा झाली. हिंगोली शहराच्या हद्दीत महसूल विभागाची जमीन उपलब्ध नसल्याने विविध विभागांच्या ताब्यातील जमिनींची अदलाबदल करून प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करण्याबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीला आमदार तानाजी मुटकुळे आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पत्रकार आणि दुर्बल घटकांसाठी म्हाडामार्फत घरे

पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्याच्या मागणीच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यातील तीन एकर जागा म्हाडाला उपलब्ध करून देण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. या जागेवर पत्रकारांसाठी स्वतंत्र वसाहत तसेच दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

या बदल्यात पशुसंवर्धन विभागाला महसूल विभागाच्या ताब्यातील गावाबाहेरील उपयुक्त जागा देण्याबाबतचा प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर करावा. पशुसंवर्धन विभागाची मान्यता घेतल्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  पंढरपुरात वारकरीच खरा ‘व्हीआयपी’; दर्शनासह सर्व सुविधा वेळेत द्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शहरात जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याचे नियोजन

हिंगोलीतील सध्याचे क्रीडा संकुल शहराबाहेर असल्याने शहरातील कृषी विभागाच्या ताब्यातील आणि क्रीडा संकुलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर नवीन संकुल उभारण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. त्यासाठी कृषी विभागाला पर्यायी ठिकाणी जमीन उपलब्ध करून देऊन संबंधित जागा जिल्हा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले.

नानाजी देशमुख स्मारकासाठी तीन एकर जागा

नानाजी देशमुख यांचे स्मारक उभारण्यासाठी तीन एकर जागेची आवश्यकता असून, प्रस्तावित जागा नगरपालिकेच्या नावाने हस्तांतरित करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त उपक्रम प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी गरज भासल्यास या विभागांना अतिरिक्त जागाही उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group