मुंबईतील प्रवास होणार अधिक वेगवान; ३१ किमी लांबीची ‘पाताल लोक’ बोगदा प्रणाली प्रस्तावित
वांद्रे-वरळी सागरी सेतू ते विमानतळ आणि पूर्व द्रुतगती महामार्ग जोडण्याचे नियोजन; भाईंदर/उत्तन-विरार मार्गाचा सुधारित आराखडाही मुख्यमंत्र्यांसमोर सादर

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत करण्यासाठी एकात्मिक रस्ता बोगदा प्रणाली आणि मुंबई-वाढवण द्रुतगतीमार्ग जोडणीचे नियोजन करण्यात येत आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतू, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-२ आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणाऱ्या प्रस्तावित बोगदा प्रणालीचा तसेच भाईंदर/उत्तन ते विरार या मार्गाच्या सुधारित आराखड्याचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी एकात्मिक रस्ता बोगदा प्रणाली (पाताल लोक) आणि मुंबई-वाढवण द्रुतगतीमार्ग जोडणीसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक व गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते.
हेही वाचा – ग्रामीण युवकांसाठी पशुधन व्यवसायाची संधी; २६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा शुभारंभ
३१ किलोमीटरची एकात्मिक रस्ता बोगदा प्रणाली
एमएमआरडीएने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, एकात्मिक रस्ता बोगदा प्रणालीचा एका दिशेचा मार्ग सुमारे ३१ किलोमीटर लांबीचा असेल. या प्रकल्पातून वांद्रे-वरळी सागरी सेतू, बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई विमानतळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना प्रवेश आणि निर्गमन मार्गांद्वारे जोडण्याचे नियोजन आहे.
या बोगदा प्रणालीमुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांसह बीकेसी आणि विमानतळाला थेट जोडणी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या व्यावसायिक, वाहतूक आणि विमानतळ परिसरांदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होऊ शकतो.
भाईंदर/उत्तन-विरार मार्गाचे दोन पर्याय चर्चेत
मुंबई-वाढवण द्रुतगतीमार्गाशी जोडणी करण्यासाठी प्रस्तावित भाईंदर/उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. या मार्गाच्या आरेखनाचे दोन पर्याय बैठकीत मांडण्यात आले. त्यावर चर्चा करून सुधारित आराखड्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
मुंबई महानगर प्रदेशातील रिंगरोडला मिळणार बळ
प्रस्तावित बोगदा प्रणाली आणि भाईंदर/उत्तन-विरार जोडणीमुळे मुंबई महानगर प्रदेशातील नियोजित रिंगरोडची जोडणी अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पांमुळे शहरातील विविध भागांमधील वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि प्रवासाचा वेळ वाचविण्यास मदत होऊ शकते.




