दमदार पावसाने आळंदीत इंद्रायणी नदीचं रौद्ररुप

दमदार पावसाने आळंदीत इंद्रायणी नदीचं रौद्ररुप

पुणे – मागील काही दिवस पावसाने दडी मारल्यानंतर शुक्रवारपासून दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आळंदीमधील इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.  आंद्र आणि वडविळे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने इंद्रायणी नदी दुथडी वाहू लागली. या पावसामुळे भुशी डॅमकडे जाणारा मार्गही पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

इंद्रायणी नदीच्या काठी असलेली लहान मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. भक्ती सोपान पूल हा पूर्णपणे पुराच्या पाण्यामध्ये गेला आहे. इंद्रायणी नदीकाठी पिंपरी चिंचवड पोलीस आणि आळंदी नगरपरिषद प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे. इंद्रायणी नदी पात्रामध्ये कुणालाही जाण्याची परवानगी नाही. प्रशासनाने इंद्रायणी नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला.

मोई, चिंबळी, कुरुळी, चाकण MIDC या गावांना पिंपरी चिंचवड शहराशी जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदी काठावरील निघोजे, मोई, कुरुळी, चिंबळी, मोशी, डूडुळगाव, केळगाव, आळंदी, सोळू, चऱ्होली, धानोरे, मरकळ, गोलेगाव आणि इतर काही गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुलावरील पाण्याचा धोका ओळखता या पुलावरील वाहतूक बंद करून ही वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गाने वळवल्याने नागरिकांना काही प्रमाणत दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *