मुख्यमंत्री सहाय्यत निधीमुळे भाजप कार्यकर्ता दुर्धर आजारातून मुक्त

- अमित गोरखे यांनी केला पाठपुरावा
पिंपरी, (महाईन्यूज) – चिंचवड, इंदिरानगर झोपडपट्टीत राहणारा भाजपचा गरीब कार्यकर्ता मिलिंद कांबळे मांडीच्या खुब्याच्या आजाराने त्रस्त होता. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिलिंदचे मोफत ऑपरेशन केले. आता मिलिंद उत्तमरित्या चालत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे, डॉ. नरेंद्र वैद्य ही माणसच देव ठरली असून मी त्यांचा आभारी असल्याचे सांगताना मिलिंदच्या डोळ्यातून अश्रू आले होते.
चिंचवड, इंदिरानगर झोपडपट्टीत मिलिंद कांबळे वास्तव्यास आहेत. भाजपचे बुथ प्रमुख म्हणून ते काम करतात. मिलिंद याला मांडीच्या खुब्याचा त्रास होऊ लागला. त्याला डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. पार्ट टाकण्याचे ऑपरेशन असल्याने पाच लाखाहून अधिक खर्च सांगितला होता. परंतु, घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची होती. त्यामुळे ऑपरेशनचा खर्च पेलू शकत नव्हता. मिलिंदने पैशांची जमवाजमव करण्यासाठी सुरुवात केली.
मिलिंद याने सांगितले, ” इंदिरानगर प्रभागाच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांना भेटण्याचा सल्ला दिला. अमित यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोफत ऑपरेशन करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा केला. महिन्याभरात मुख्यमंत्री सहाय्यता योजनेचा लाभ मिळवून दिला. आठ दिवसांपूर्वी निगडीतील लोकमान्य रुग्णालयात खुब्याचे मोफत यशस्वी ऑपरेशन झाले. त्यामुळे आज मी उत्तमरित्या चालू शकत आहे.
याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरसेविका अनुराधा गोरखे, युवकांचे आशास्थान अमित गोरखे यांना जाते. माझ्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री आणि गोरखे मायलेक, डॉ. नरेंद्र वैद्य ही माणसचं देव ठरली आहेत. मी त्यांचा आभारी असल्याचे सांगताना मिलिंदचे डोळ्यातून अश्रू आले होते.





