आम्हाला विशेष प्रशासकीय व वित्तीय अधिकार द्या, राज्यातील 27 मनपाच्या महापौरांची मागणी

पिपंरी, (महाईन्यूज) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहराचे महापौर पद भूषविले असल्याने महापौरांच्या समस्यांची त्यांना जाण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व २७ महापालिकेतील महापौरांना विशेष प्रशासकीय व वित्तीय अधिकार द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी लोणावळा येथे आयोजित महापौर परिषदेच्या उद्घाटन समारंभात केली.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई व महाराष्ट्र महापौर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व्या महापौर परिषदेचे आयोजन लोणावळा येथे करण्यात आले होते. त्यावेळी राज्यातील विविध १६ महापालिकांचे महापौर उपस्थित होते.
महापौर पद हे केवळ शोभेचे बाहुले असून त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकार नाहीत. जर शहरात जर काही समस्या उद्भवली, तर सामान्य नागरिक हे महापौरांना जबाबदार धरतात, आणि महापौरांकडून त्यांच्या रास्त मागण्यांसंबंधी न्याय मिळण्याची त्यांची भावना असते. मात्र, महापौर हे संबंधित अधिकारी वर्गास सुचना देण्याशिवाय काहीही करु शकत नाहीत. अशा प्रकारच्या भावना हया सर्व महापौरांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट् महापौर परिषदेच्या उपाध्यक्षा व नागपूर महापालिकेच्या महापौर नंदा जिचकार, माजी केंद्रीय सचिव जयराज फाटक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण यावेळी उपस्थित होते. महापौर राहुल जाधव व इतर उपस्थित सर्व महापौरांनी परिषदेत यापूर्वी महापौरांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार मिळण्यासाठी जे विविध ठराव करुन शासनाला पाठविले त्याबाबत काहीच ठोस निर्णय न झाल्याने खंत व्यक्त केली. यापुढील महापौर परिषद ही जूलै किंवा ऑगस्ट मध्ये पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात येईल व त्यावेळी मुख्यमंत्री यांना आमंत्रित केले जाईल असे प्रतिपादन महापौर राहुल जाधव यांनी केले.





