मी दहशतवादावर हल्ला करतोय आणि राहुल गांधी माझ्यावर हल्ला करत आहेत – नरेंद्र मोदी

पाकिस्तानातील दहशतवादी तळावर केलेल्या एअरस्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्या विरोधी पक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत. मी दहशतवादावर हल्ला करतोय आणि राहुल गांधी माझ्यावरच हल्ला करत आहेत. मोदी दहशतवादावर स्ट्राइक करण्यामध्ये गुंतला आहे आणि ते मोदीवर स्ट्राइक करण्यामध्ये व्यस्त आहेत असे नरेंद्र मोदी म्हणाले. गुजरातमधल्या वस्त्राल येथील सभेत ते बोलत होते.
एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले त्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी या एअर स्ट्राइकची सविस्तर माहिती मागितली आहे. कपिल सिब्बल, दिग्विजय सिंह या काँग्रेस नेत्यांनी या कारवाईत नेमका किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला त्याचे आकडे जाहीर करण्याची मागणी केली आहे.
भाजपाच्या काही नेत्यांनी २५० दहशतवादी या कारवाईत मारले गेल्याचे म्हटले आहे. एकूणच या विषयावरुन राजकारण सुरु आहे. मोदीला हटवण्यासाठी ते महामिलावट करण्यामध्ये ते गुंतले आहेत आणि मोदी किसान-कामागार हिताच्या सुरक्षेसाठी काम करत आहे. ते मोदीवर स्ट्राइक करण्यामध्ये गुंतले आहेत आणि मोदी दहशतवादावर स्ट्राइक करण्याच्या कामामध्ये गुंतला आहे असे मोदी म्हणाले. ते म्हणतात एकत्र येऊन मोदी हटवू मी म्हणतो आपण एकत्र येऊन गरीबी हटवू असे मोदी म्हणाले.






