सरकारची गाजर वाटण्याचीही ऐपत नाही ; उद्धव ठाकरे यांचा सरकारला टोला

बीड – घोषणांचा पाऊस पाडून दुष्काळी भागातील हंडा भरत नाही. घोषणा बंद करुन अंमलबजावणी करा, यासाठी शिवसेनेचा आग्रह आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी घोषणा केल्या जात आहेत, पण तुमचे दिवस किती उरलेत? असा सवाल करुन या सरकारकडे गाजर वाटण्याचीही ऐपत नसल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
केंद्र सरकारकडून पीक विमा योजना, उज्ज्वला गॅस, सौभाग्य या योजनांच्या नावाखाली सगळीकडे फसवणूक चालू आहे. महाराष्ट्राला हजारो कोटी रुपयांचा निधी दिल्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात काय मिळाले? असा प्रश्न उपस्थित करुन केंद्राच्या पथकाने दुष्काळी पाहणी करुन दोन महिने उलटले तरी एक दमडाही मिळाला नाही अशीही टीका त्यांनी केली.
बीड येथे बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्य आणि पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार नीलम गोऱ्हे, गोिवद घोळवे, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक आदी उपस्थित होते. या वेळी सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्याच्या कारभाराचे वाभाड काढले. दुष्काळ पडल्यानंतर सरकारला तो समजण्यासाठी यंत्रणा उभी करावी लागते. केंद्राचे पथक येऊन दोन महिने लोटले तरी दमडाही मिळाला नाही. मग हे काय लेझीम किंवा बँजो पथक होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी देश बदलत असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र मोदी दररोज वेगवेगळ्या देशांमध्ये दौरे करत असल्यामुळे त्यांच्यासाठी देश बदलतो, इथल्या देश बांधवांचे दुख बदलत नाही. शिवसेनेने सरकारकडून कर्जमाफी करुन घेतली. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ती मिळाली नाही. निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या उज्ज्वला गॅस, पीक विमा, सौभाग्य आणि कर्जमाफीच्या घोषणा या निव्वळ ‘निवडणूक जुमला’ आहेत. खोटे बोलून मत घेणे इतकेच भाजपचे धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला हजारो कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात किती मिळाला?. नुसत्या कोरडय़ा घोषणांनी दुष्काळी भागातील हंडे भरत नाहीत. घोषणांचे सोंग आणि ढोंग आणले जाते पण तुमचे दिवस किती उरलेत? घोषणा थांबवा थेट मदत द्या असा टोलाही त्यांनी लगावला. सरकारकडे गाजर वाटण्याचीही ऐपत नाही, अशा शब्दात भाजप सरकारच्या कारभारावर आसूड ओढला.
सेनेचा राजकीय दुष्काळ संपवा
बीड जिल्ह्यातील नैसर्गिक दुष्काळी परिस्थितीत शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे. मात्र, राजकीय पातळीवर या जिल्ह्यात सेनेचा दुष्काळ तुम्ही संपवणार का, असा थेट उपस्थितांना प्रश्न विचारुन जिल्ह्यातील राजकीय दुष्काळ संपवण्यासाठी आगामी काळात शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. जिल्ह्यात मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीपासून सेनेचा एकही आमदार अथवा स्थानिक संस्थेत सत्ता नाही.
युतीच्या चर्चेपेक्षा शेतकऱ्यांना मदत करा
युतीबाबत माध्यमातून चर्चा असल्याचा उल्लेख करुन युतीची चर्चा गेली खड्डय़ात, शेतकऱ्यांना मदत करा याचा पुनरुच्चार केला. पहिल्यांदा राम मंदिर नंतर सरकार अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. तर प्रमाणपत्र मिळूनही कर्जमाफी न झालेल्या अंजनडोह येथील शेतकरी बाळासाहेब सोळंके याला सभेत उभे करुन ठाकरे यांनी कर्जमाफी फसवी असल्याचे उघड केले. पीक विमा योजनेतही मोठय़ा प्रमाणात घोटाळा झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आगामी काळात शिवसेना शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सरकारला जाब विचारेल असा इशारा दिला.




