हातभट्टी दारूची वाहतूक करणा-या रिक्षावर वाकड पोलिसांची कारवाई

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – रिक्षामधून दारूची वाहतूक करणा-या रिक्षाचालकाला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. या कारवाईत 225 लीटर हातभट्टी दारु भरलेले सात कॅन ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी (दि. 7) वाकड चौकात केली.
सागर नरसिंग चांढके (वय 29, रा. आंबेडकर पुतळ्यामागे, पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाकड चौकात सापळा रचून एमएच 12, डीटी 0969 या संशयास्पद रिक्षा थांबविला. रिक्षामध्ये ठेवलेल्या कॅनची तपासणी केली. त्यात गावठी हातभट्टी दारू आढळून आली. रिक्षा चालकाला अटक केली. यात एका महिलेचा समावेश असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, प्रमोद कदम, मधुकर चव्हाण, नितीन गेंगजे, शाम बाबा, श्रुती सोनवणे यांच्या पथकाने केली.





