केबल-डीटीएच चॅनल निवडण्यासाठी मुदतवाढ

पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपानंतर ट्रायने केबल- डीटीएचचे नवे चॅनल निवडण्याची डेडलाइन एक महिन्यांसाठी वाढविली आहे. पूर्वी ही तारीख २८ डिसेंबर होती. त्यानंतर चॅनल न निवडणाऱ्या ग्राहकांना डीटीएचवर ब्लॅक आउटचा धोका होता. नव्या तारखेनुसार आता ग्राहकांकडे ३१ जानेवारी २०१९ पर्यंतची वेळ असेल. ट्रायने चॅनल्सच्या मनमानी फी वसुलीवर प्रतिबंध आणण्यासाठी प्रति चॅनलनुसार दर वसूल करण्याचे नियम केले आहेत. तर, सर्व केबल- डीटीएच ग्राहकांनी २९ डिसेंबरपर्यंत आपले चॅनेल निवडावे अशी सूचना केली आहे.
‘ट्राय’ची बाजूप्रक्षेपक कंपन्या आणि केबल व्यावसायिकांकडून प्रेक्षकांची अडवणूक होऊ नये यासाठी ट्रायने नवा आदेश संकेतस्थळावर जाहीर केला होता. त्यानुसार, यापुढे अशा प्रकारे सशुल्क वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करता येणार नाही. नव्या दर प्रणालीचे काम ३ जुलै २०१८ लाच पूर्ण झाले होते. त्यानंतर प्रक्षेपक कंपन्या एमएसओ, एलसीओ आणि डीटीएचचालकांना पुरेसा वेळ देण्यात आला होता.
‘ग्राहक आणि केबलचालकांचाही फायदा’
- ट्रायच्या नव्या नियमानुसार, २९ डिसेंबरपासून ग्राहकांना नको असलेल्या वाहिन्या घेण्याची सक्ती करता येणार नाही.
- ट्रायला बार्ककडून (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल) मिळालेल्या आकडेवारीनुसार सर्वसाधारण ग्राहक ४० पेक्षा कमी वाहिन्या बघतात. त्यामुळे त्यांना महिन्याची भाडेआकारणी ते सध्या भरत असलेल्या रकमेपेक्षा कमीच असणार आहे.
- मल्टिपल सिस्टिम ऑपरेटरप्रमाणे बदलत्या काळानुसार अपडेट ठेवले तर लोकल केबलचालकांनाही फायदा होणार आहे, असे ट्रायचे म्हणणे आहे.





