नितीशकुमारांनी जनमतावर बलात्कार केला-तेजस्वी यादव

बिहारमध्ये डबल इंजिनाचे सरकार आहे असे बोलले जाते. काका नितीशकुमार यांनी जनमतावर बलात्कार केला अशी जहरी टीका राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे. रालोसपाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी महाआघाडीत प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर हा आरोप केला आहे. नरेंद्र मोदी बिहारमध्ये आले होते तेव्हा बिहारच्या जनतेला विकासासाठी किती पैसे देऊ? अशी बोलीच त्यांनी लावली होती. ७० हजार कोटी, ८० हजार कोटी असे विचारता विचारता सव्वा लाख कोटींचे पॅकेज बिहारसाठी जाहीर करण्यात आले. त्यापैकी किती पैसे बिहारच्या जनतेला मिळाले? काय विकास झाला? नितीशकुमारांनाही एक छदाम मिळाला असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं म्हणजे मग आम्हीपण मोदींचे अभिनंदन करू असा खोचक टोलाही तेजस्वी यादव यांनी लगावला.
महाआघाडीची लढाई ही देशातल्या हुकुमशाही विरोधात आहे अशीही घोषणा यावेळी तेजस्वी यादव यांनी केली. या सरकारने देशाची फसवणूक केली आहे. जनतेला आश्वासनं दिली आणि एकही आश्वासन पाळलेले नाही. बिहारचा विकास करणार होते त्याचे काय झाले? बिहारची जनता आजही विकासापासून वंचित आहे अशात पंतप्रधान काय आणि मुख्यमंत्री नितीशकुमार काय दोघेही मूग गिळून गप्प आहेत अशीही टीका तेजस्वी यादव यांनी केली. महाआघाडीची सत्ता आली तर बिहारला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त करून देऊ असेही आश्वासन तेजस्वी यादव यांनी दिले.





