बोगस बांधकाम परवानगी प्रकरण, अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – च-होली येथील डिलाइट डेव्हलपर्सने खोटी कागदपत्रे सादर करून महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी मिळविली होती. यामुळे महापालिकेची फसवणूक केली म्हणून बांधकाम व्यावसायिकासह महापालिकेतील बांधकाम परवाना विभाग, नगररचना विभाग, सिटी सर्व्हे विभागातील दोषी अधिका-यांवरही फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असलेल्या च-होली बुद्रुक येथील सर्व्हे नंबर ५०६ येथे डिलाइट डेव्हलपर्स यांच्या वतीने ‘इको पार्क’ नावाने गृहप्रकल्प उभारला जात आहे. या ठिकाणी १२ मजल्याच्या दोन इमारती उभारल्या असून, तिस-या इमारतीचे काम सुरू केले आहे. यासाठी महापालिकेने २०१५ मध्ये बांधकाम करण्याची परवानगी दिली होती. प्रकाश तापकीर आणि दिनेश पटेल यांना परवानगी मिळाली होती. संबंधित विकासकाने सुमारे ६५ एकर जागेवर प्रकल्प उभारला आहे. विकसकाने सादर केलेल्या कागदपत्रांनुसार महापालिकेडून २८ फूट रस्त्यामुळे सहा मजली इमारतीस परवानगी मिळणार होती. मात्र सहा ऐवजी १२ मजली इमारतीसाठी शेजारचे जागा मालक आनंद सरवदे यांच्या जागेवर अतिक्रमण करून ती रस्त्यासाठी दाखविली. तो महापालिका अधिका-यांनी कोणतीही शहानिशा व पडताळणी न करता मंजूर केला. ही गंभीर बाब कागदपत्रांसह पुराव्यांसह सरवदे यांनी निदर्शनास आणून दिली.




