तपासणी मोहीम: पालिकेत आढळले १०० कामचुकार कर्मचारी, कारवाईस हात थिटे

पिंपरी – कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत उपाहारगृहात तास न् तास गप्पांचे फड रंगवणारे, विनापरवाना गैरहजर राहणारे तसेच शासकीय कामाच्या वेळेत स्वतःचे उद्योगधंदे सांभाळणा-या कामचुकार कर्मचा-यांची मंगळवारी (दि. 25) अचानक तपासणी करण्यात आली. प्रशासनाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे यांनी स्वतः पालिकेच्या तीन्ही मजल्यावर फिरून हे कामचुकार अधिकारी, कर्मचारी जाग्यावर आहेत की नाही, याची पाहणी केली. बहुतांश अधिकारी, कर्मचारी जाग्यावर नसल्याचे आढळल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. पालिकेचे कामकाज सुरू होताच सकाळी दहापासून कर्मचारी बाहेरचा रस्ता धरतात. ते पुन्हा येण्याचे नावच घेत नाही. बहुतांश कर्मचारी उपाहारगृहात बसलेले असतात. अधिकारी वेळेवर येतच नाहीत. साईटवर असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अशा कामचुकारपणामुळे नागरिकांची कामे खोळंबतात. याविषयी सातत्याने तक्रारी झाल्या आहेत. तथापि, कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले आहेत.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यापूर्वी अचानक तपासणी केल्यानंतर बरेच कर्मचारी जागेवर नसल्याचे आढळून आले होते. मात्र, कडक कारवाई न झाल्याने हे प्रकार सर्रास सुरू होते. मंगळवारी सकाळी प्रशासन विभागाच्या वतीने तपासणी पथकाद्वारे अचानक पाहणी करण्यात आली. मुख्यालयातील सर्व विभाग तसेच उपाहारगृहांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. तेव्हा अनेक कर्मचारी दोषी आढळून आले. त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. काहीजण उशिरा आले तर काही विनापरवाना गैरहजर राहिले होते. कित्येकांनी पालिकेचे गणवेश घातले नव्हते. काहींनी ओळखपत्र बाळगले नव्हते. यापुढे कर्मचा-यांना वेळेत पालिकेत येणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच, त्यांना पालिकेचे ओळखपत्र आणि गणवेश घालावाच लागणार आहे.
या कार्यवाहीत गैरवर्तन करणारे १०० हून अधिक कर्मचारी आढळून आले आहेत. त्या कर्मचाऱ्यांची नोंद घेण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या प्रमुखांना आहेत. त्यांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत.





