शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याच्या कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद

पर्यावरण रक्षणात आपलाही हात लागावा; पक्षनेते एकनाथ पवार यांचे नागरिकांना आवाहन
पिंपरी –| प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी शाडू मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा प्रभाग क्रमांक ११ मधील महात्मा फुले नगर बॅडमिंटन हॉल या ठिकाणी घेण्यात आली. सामाजिक उपक्रमास पूर्णानगर, फुलेनगर, घरकुल या भागातील महिला, विद्यार्थी व नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने शाडूच्या मातीने गणपती मोठ्या उत्साही वातावरणात बनविल्या.
या शाडू माती गणपती कार्यशाळेचे मुख्य आयोजन पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए ) या सामाजिक संस्थेच्या वतीने केले करण्यात आले होते. महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, इसिएचे विकास पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्यंत उत्साही वातावरणात शाडू मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा संपन्न झाली. दरम्यान बघता बघता शाडू मातीचे गणपती तयार झाले. या कार्यशाळेत 200 हून अधिक शाडू मातीचे गणपती बनविले, आणि आपल्या घरी हीच सुंदर मूर्ती यंदा बसविण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले कि, पर्यावरण रक्षणात आपलाही हात लागावा म्हणून हि कार्यशाळा आयोजित केली गेली. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्ती विसर्जनानंतरही कित्येक दिवस पाण्यात विघटित होत नाहीत. त्यामुळे त्यांची विटंबनाही होते. रासायनिक रंगामुळे नद्या,तलाव, विहिरीमधील पाणी प्रदूषित होते. याला रोखण्यासाठीच प्लास्टर ऑफ पॅरीसच्याऐवजी शाडूच्या मातीचा जास्तीत वापर होणे गरजेचे आहे. त्यामुळे घरोघरी शाडू मातीपासून तयार झालेले गणपती स्थापन होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे तसेच संस्कृतीचे रक्षण होईल.





